नोटा बनविण्यासाठी कोल्हापुरात दुकानांतून खरेदी केले साहित्य

कोल्हापूर: बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे कागद, रंग, पट्टी, शिक्के आदी साहित्य कोल्हापुरातील वेगवेगळ्या दुकानांतून खरेदी केल्याचे समोर आले आहे. संशयितांना चौकशीसाठी सोमवारी (ता. २३) कोल्हापुरात फिरविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.बनावट नोटा तयार करणारा मुख्य संशयित संदीप कांबळेच्या मागे आणखीन सूत्रधार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने यासाठी कोणाकोणाचा आधार घेतला, बनावट नोटा कुठे खपविल्या, सीडीआर, कॉल डिटेल्स यांची तांत्रिक तपासाच्या आधारे कसून चौकशी सुरू आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणारी टोळी पकडून जेरबंद केली होती. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर शुक्रवारी (ता. २०) ही कारवाई केली होती.संशयित चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (रा. कसबा तारळे), अभिजित राजेंद्र पवार (रा. गडमुडशिंगी), दिग्विजय कृष्णात पाटील (रा. शिरोली पुलाची) व संदीप बाळू कांबळे (रा. कळे, ता. पन्हाळा) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.चार लाख ४५ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह संगणक, प्रिंटर, इतर साहित्य व चारचाकी गाडीसह बारा लाख ६२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.संशयितांकडून अधिक तपासात तारळे येथील संशयित चंद्रशेखर पाटील याने कळेतील संदीप कांबळे याला अभिजित पवारमार्फत नोटा बनविण्यासाठी लाखभर रुपये रक्कम दिली होती.त्याबदल्यात चार ते पाच लाख रुपये बनवून देण्याचे संदीपने मान्य केले होते. दिलेली रक्कम ही उधार स्वरूपात होती. ती परत मागितली असता मला बनावट नोटा दिल्याचे संशयित चंद्रशेखरचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.बनावट नोटा बनविणारा संशयित संदीप कांबळे याची व तारळे येथील मुख्य संशयित चंद्रशेखर पाटील याची थेट ओळख नसल्याचेही समोर आले आहे.अभिजित पवार व संदीप कांबळेची ओळख कशी झाली, याबाबत चौकशी सुरू आहे. संशयित दिग्विजय पाटील हा काही वर्षांपासून चंद्रशेखरच्या गाडीवर चालक असल्याचे स्पष्ट झाले आहे.संशयित कांबळे याला संशयित अभिजित पवार याने बनावट नोटा तयार करण्यास सांगितले. तयार केलेल्या नोटा खपविण्याची जबाबदारीही त्याने घेतली होती. संदीपने पहिल्यांदा नकार दिला होता. दरम्यान, संदीपचे कर्जबाजारीमुळे सगळे मार्ग खुंटले होते. एक महिन्यानंतर त्याने पवारची ऑफर स्वीकारली.तो रोज मध्यरात्री उशिरापर्यंत घरी यायचा नाही. त्यामुळे त्याचा गल्लीतील लोकांशी संपर्कही कमी होता. संशयित संदीपचे वडील अंध आहेत. वृद्ध आई आजही ढाबा, हॉटेलमध्ये धुणीभांडी करते. तर पत्नी रोजंदारीवर कामाला जाते. संदीप सुरुवातीपासूनच आर्थिक उपद्‌व्याप करीत आला आहे.

बनावट नोटा तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

भारत सरकारचे चलार्थ पत्र मुद्रणालय नाशिक येथे आहे. जप्त केलेल्या बनावट नोटा तपासणीसाठी नाशिक येथील मुद्रणालयात लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने