ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदानंतर नोवाक जोकोविचची मुसंडी

ऑस्ट्रेलिया: सर्बीयाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने रविवारी ग्रीसच्या स्टेफानोस सितत्सिपास याच्यावर ६-३, ७-६, ७-६ असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला आणि २२व्या विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. याप्रसंगी त्याने राफेल नदालच्या २२ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी केली.जोकोविच याने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया या वेळी साधली. या अजिंक्यपदासोबतच जोकोविच याने पुन्हा एकदा एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली.जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम दहा वेळा, विम्बल्डन सात वेळा, अमेरिकन ओपन तीन वेळा आणि फ्रेंच ओपन दोन वेळा जिंकले आहे. जोकोविच याने चार स्थानांची प्रगती करताना पहिल्या स्थानावर मुसंडी मारली आहे. तसेच उपविजेता स्टेफानोस चौथ्यावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कार्लोस अल्काराझ पहिल्यावरुन दुसऱ्या स्थानावर आला आहे.
आयुष्यातील सर्वात मोठा विजय - जोकोविच

विजेतेपदानंतर जोकोविच भावुक झाला. तो म्हणाला, मागील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होता आले नाही. परिस्थितीवर नजर टाकता ही स्पर्धा माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर स्पर्धा होती. मागील पाच ते सहा आठवडे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. माझे कुटुंब व टीमला याबाबत चांगले माहीत आहे. याच कारणामुळे माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा विजय होता, असे जोकोविच म्हणाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने