KMT कडून ५० ई-बसचा प्रस्ताव

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून ५० इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यासाठी केएमटीने दिलेल्या प्रस्तावाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून बस मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. किमान काही बस मिळाल्या तर ई-बससाठीच्या सुविधा निर्माण होऊन भविष्यात आणखी बस घेण्याची संधी मिळणार आहे.केएमटीने यापूर्वी ई-बससाठी प्रस्ताव दिला होता. पण, त्यावर काही निर्णय झालेला नाही. सध्या केएमटीची अवस्था वाईट असल्याने बसची संख्या वाढवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर खासदार महाडिक यांनीही ते प्रस्ताव देण्यास केएमटी प्रशासनाला सांगितले होते. त्यानुसार केएमटीने ५० इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या प्रस्तावाबाबत प्रयत्न करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. तत्पूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुढील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळीही बससाठी प्रयत्न केला जाणार आहे.एक कोटीच्या आसपास एका बसची किंमत असून त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभे करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात किमान काही बस उपलब्ध झाल्या तर अंबाबाई तीर्थक्षेत्राच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांसाठी काही ई बस वापरता येऊ शकतील. तसेच ई-बसच्या सुविधा निर्माण होऊन पुढील बसच्या प्रस्तावांसाठी पाठपुरावा करणे सोपे होणार आहे.

महापालिका ताफ्यातील आता केवळ ७० बस मार्गावर धावत आहेत. तसेच काही बस आयुर्मान संपलेले असूनही चालवल्या जात आहेत. जेएनयुआरआरएममधून घेतलेल्या बसेसपैकीही मोठ्या प्रमाणावर बस नादुरूस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठीही मोठा खर्च आहे. यामुळे मार्गावर बस संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी बस संख्या वाढवण्याचा एकमेव पर्याय आता केएमटीसमोर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने