गतविजेत्या नदालचा विजयासाठी संघर्ष

ऑस्ट्रेलिया: गतविजेता राफेल नदालला सोमवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सलामीच्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. २१ वर्षीय इंग्लंडच्या जॅक ड्रॅपर याच्या पायाला दुखापत झाल्यानंतरही त्याने नदालला विजयासाठी झुंजवले. नदालने या लढतीत ७-५, २-६, ६-४, ६-१ असा चार सेटमध्ये विजय मिळवला. मात्र या विजयासाठी तीन तास ४१ मिनिटे झुंजावे लागले.

नदालने पहिल्या गेममध्ये संयमी खेळ केला. त्याच्याकडे ६-५ अशी आघाडी असताना जॅककडे सर्व्हिस होती. या सर्व्हिसवर नदालने अप्रतिम खेळ केला आणि पहिला गेम ७-५ असा जिंकत आघाडी घेतली. पण जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर असलेल्या जॅक याने दुसऱ्या गेममध्ये झोकात पुनरागमन करताना ४-० अशी आघाडी घेत पुढे जाऊन हा सेट ६-२ असा आपल्या नावावर केला. नदालने तिसऱ्या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी मिळवली. दीर्घ रॅलीवर वर्चस्व राखले. याच दरम्यान जॅकच्या पायाला दुखापत झाली. दुखऱ्या पायासह तो टेनिस कोर्टवर लढत होता. अखेर नदालने तिसरा सेट ६-४ असा आणि चौथा सेट ६-१ असा जिंकत पुढल्या फेरीत पाऊल ठेवले. मेलबर्न पार्कमधील नदालचा हा ७७ वा विजय ठरला.



तिसरा मानांकित सितसिपासची घोडदौड

तिसऱ्या मानांकित स्टेफानोस सितसिपास यानेही पुरुषांच्या एकेरीत घोडदौड केली. त्याने क्वेटीन हॅली याच्यावर ६-३, ६-४, ७-६ असा तीन सेटमध्ये आरामात विजय मिळवला. ह्युबर्ट हर्काझ याने पेड्रो मार्टीनेझ याला ७-६, ६-२, ६-२ असे पराभूत केले. यानिक सिन्नर, फेलिक्स एलीयासिम, कॅमेरुन नोरी, फ्रान्सेस टिएफो व डेनिस शॅपोवालोव यांनीही पुरुषांच्या एकेरीत प्रतिस्पर्ध्यांना हरवत पुढे पाऊल टाकले.

अव्वल मानांकित स्वीअतेकची कूच

व्हिक्टोरिया अझारेंका-सोफिया केनिन या दोन माजी विजेत्या टेनिसपटूंमध्ये महिला एकेरीची सलामीची लढत रंगली. २४वी मानांकित अझारेंकाने या लढतीत ६-४, ७-६ असे सरळ दोन सेटमध्ये यश मिळवले. अव्वल मानांकित इगा स्वीअतेक हिने ज्युल निमिएर हिच्यावर ६-४, ७-५ असा सहज विजय मिळवला. स्वीअतेक हिने तब्बल दोन तासांमध्ये ही लढत जिंकली. सातवी मानांकित कोको गॉफ हिने कॅटरीना सिनीएकोवा हिचे आव्हान ६-१, ६-४ असे संपुष्टात आणले. सहावी मानांकित मारिया सक्कारी हिनेही पहिल्या फेरीचा अडथळा सहज ओलांडला. तिने युए युआन हिला ६-१, ६-४ असे नमवले. याशिवाय जेसिका पेगुला, पेट्रा क्वितोवा, इमा राडुकानू यांनीही महिला एकेरीत विजय संपादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने