महाराष्ट्र केसरी शिवराजच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले, खेळात राजकारण...

पुणे : पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा रंगली होती. फायनलमध्ये शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले आणि महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला. शिवराजला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आणि ५ लाख रूपये बक्षीस रक्कम मिळाली. त्याचबरोबर शिवराजला महिंद्रा थार ही एसयुव्ही देखील मिळाली. दरम्यान महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंनी शिवराज राक्षेचा सत्कार केला. यावेळी उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. "कुस्ती हा खेळ पूर्वीच्या काळापासून आहे. शिवराजला मानलं पाहीजे. त्याने खूप कष्ट घेतले. त्यामुळे आज महाराष्ट्र केसरीचा किताब शिवराजने पटकावला आहे. अजून तो तरुण आहे त्याला खूप पुढे जायचे आहे. पण एका गोष्टीची खंत वाटते की ज्या मोठ्या-मोठ्या स्पर्धा आहेत तिथे राजकारण पाहायला मिळते. हे थांबल पाहीजे असं मला वाटते. चांगला कुस्तीपटूसाठी कुणाची शिफारस असता कामा नये," असे उदयनराजे म्हणाले. वेगवेगळ्या खेळांमध्ये जे खेळाडू असतात. त्यांना नैराश्य येते, असं होता कामा नये. भारताची टीम ऑलिंपिकमध्ये जाते. एखादं मेडल आपल्याला मिळतं पण बाकीचे छोटे देश अनेक मेडल जिंकून येतात. त्यामुळे अशा खेळाडूंना राज्य सरकार, केंद्र सरकार ने प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे देशाचे नाव लौकीक होईल, असे देखील उदयनराजे म्हणाले. शिवराजला पुढील वाटचालीसाठी माझ्या वतीने आणि कुटुंबियांच्या वतीने खूप शुभेच्छा. हिंद केसरी पण शिवराज राक्षे याने आता पटकावयला हवा, अशी इच्छा उदयनराजे यांनी व्यक्त केली.संभाजी राजे स्वराज्य रक्षक होते की धर्म रक्षक -छत्रपती संभाजी राजे स्वराज्य रक्षक होते की धर्म रक्षक या वादावर देखील उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आपण कोणी देव बघितला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान खूप मोठे आहे. हा मुद्दा घेऊन प्रत्येकजण काहीना काही बोलत असतं. शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती धर्माच्या लोकांमध्ये भेदभाव केला नाही."

"राजकीय पक्ष त्यांच्या अॅंगलने बोलत असतात. शिवाजी महाराज व संभाजीराजेंनी धर्माचा अनादर केला नाही. हे दोघेही स्वराज्य रक्षक आणि धर्म रक्षक होते. या दोन्ही शब्दात काही वावगं नाही. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे. वाद घालण्यात काही उपयोग नाही. ज्या लोकांनी एवढं योगदान दिले त्यांचा अवमान करू नका", असे आवाहन उदयन राजे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने