‘गोकुळ’च्या कारभाराचा लवकरच भांडाफोड; शौमिका महाडिक यांची फेसबूक पोस्ट चर्चेत

कोल्हापूर : गेली चार महिने मी कोल्हापूर जिल्हा दूध संघातील (गोकुळ) गैरकारभाराची कागदपत्रे आणि पुरावे जमवत होते. त्यातून हाती आलेल्या गैरकारभाराचा भांडाफोड मी लवकरच करणार असल्याचा इशारा संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिला आहे. त्यांनी आज फेसबूकवर एक पोस्ट टाकून याविषयीची माहिती दिली.‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी विरोधकांना घाम फोडला होता. त्यानंतर जवळपास मी चार महिने शांत होते. ना पत्रकार परिषद, ना विरोधी वक्तव्य. पण, या कालावधीत मी फक्त संघामधील गैरकारभाराची कागदपत्रे व पुरावे जमवत होते.याच फळ लवकरच सर्वांसमोर येईल आणि त्यानंतर मी पत्रकार परिषदेत माझी बाजू जिल्ह्यातील दूध उत्पादकांसमोर पुराव्यासह मांडण्याचा इशारा महाडिक यांनी या फेसबूक पोस्टमध्ये दिला आहे.शेवटी संयम महत्त्वाचा असतो, संयम ठेवा, जिल्ह्यातील प्रत्येक दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी महाडीक कुटुंबीय बांधील आहे आणि न्याय आम्ही नक्की मिळवून देऊ, असा विश्‍वासही यात व्यक्त केला आहे.महाडिक यांच्या या फेसबूक पोस्टवरील इशाऱ्याने ‘गोकुळ’च्या राजकारणाला पुन्हा उकळी फुटणार आहे.‘गोकुळ’मधील माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता खालसा करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी २१ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या.त्यानंतर सातत्‍याने महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या कारभाराविषयी विविध प्रश्‍न उपस्थित केले होते. आता नव्याने त्यांनी पुराव्यासह संघातील कारभार चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिल्याने महाडिक-पाटील या वादालाही पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने