मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? सुषमा अंधारेंचा सोमय्यांना सवाल

मुंबई : एकीकडे राज्यात अनेक मुद्यावरून राजकारण सुरू असतानाच दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढताना दिसून येत आहेत. किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षात नवीन लोकांचे घोटाळे बाहेर काढू असं आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन सांगितलं होतं. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरतीही गंभीर आरोप केले आहेत.कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले होते. मात्र, आता हे बंगले आता गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याच गोष्टींवरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.
यासंबधी बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असते. ते फार आरंभशूर आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचे काहीच होत नाही. राहिला प्रश्न त्या 19 बंगल्याचा, जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे असं अंधारे म्हणाल्या आहेत.सह्याद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीटभाऊंनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी, असा खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने