सौरमालेबाहेर पृथ्वीच्या आकारातील ग्रह

न्यूयॉर्क : पृथ्वीपासून साधारणपणे १५ लाख किलोमीटर दूर अवकाशाच्या निर्वातात एक वर्षापासून अधिक काळ असलेल्या जेम्स बेव टेलिस्कोपने प्रथमच आपल्या सौरमालेबाहेर पहिल्या ग्रहाचा शोध घेतला आहे. ही दुर्बीण म्हणजे भावी पिढ्यांसाठीची एक वेधशाळा असून आता ग्रहांचा शोधही याद्वारे घेतला जात आहे.मेरीलँडमधील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीमधील खगोलशास्त्रज्ञ केव्हिन स्टिव्हनसन आणि जॅकोब लस्टिंग-येगेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा शोध लागला आहे. अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची २४१ वी बैठक सिएटलमध्ये बुधवारी (ता.११) आयोजित केली होती.त्यात या शोधाची माहिती देण्यात आली. ‘‘एलएचएस ४७४ बी’ या नव्या ग्रहाचा शोध लागला यात काहीही शंका नाही. ‘वेब’च्या माहितीतून त्याला दुजोरा मिळाला आहे. खरे तर छोटा, खडकाळ ग्रहाचा शोध ही या वेधशाळेची प्रभावी कामगिरी आहे, असे स्टिव्हनसन आणि येगेर म्हणाले.ग्रहावर वातावरण आहे?

सूर्यमालेबाहेरील पृथ्वीच्या आकाराच्या ग्रहावरील वातावरणाचे वर्णन करण्यास जेम्स बेव टेलिस्कोपने सक्षम आहे, हे या दुर्बिणीचे वैशिष्ट आहे. वेबच्या ट्रान्समिशन स्पेक्ट्रमद्वारे ‘एलएचएस ४७४ बी’वरील वातावरणाचे निरीक्षण करण्यात येत आहे. सौरमालेबाहेरील या ग्रहावर वातावरण आहे, का याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.

नवा ग्रह असा आहे

  • ‘एलएचएस ४७४ बी’ हे नाव

  • साधारण पृथ्वीएवढा आकार

  • पृथ्वीपासून तुलनेने जवळ

  • पृथ्वीपासून ४१ प्रकाशवर्षे अंतर

  • पृथ्वीप्रमाणे वातावरण असण्याची शक्यता कमी

  • शनीचा चंद्र टायटनप्रमाणे ‘एलएचएस ४७४ बी’वर मिथेनचे जाड आवरण असू शकते

  • हा ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती फक्त दोन दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो

  • आपल्या सूर्यमालेतील ग्रहांच्या तुलनेत नवा ग्रह त्याच्या ताऱ्याजवळ असला तरी लाल रंगातील त्याच्या लघुग्रहाचे तापमान सूर्यापेक्षा निम्मे आहे.

सूर्यमालेबाहेरील लहान, खडकाळ ग्रहाचा अभ्यास करण्यात आमचे प्राधान्य आहे. तेथील वातावरण कसे आहे, याचा शोध घेण्यास आम्ही नुकतीच सुरुवात केलीआहे.

- लस्टिंग येगेर, खगोलशास्त्रज्ञ

पृथ्वीच्या आकारातील या ग्रहाच्या प्राथमिक निरीक्षणांमुळे भविष्यात खडकाळ ग्रहावरील वातावरणाचा ‘वेब’द्वारे अभ्यासाची दरवाजे खुले होतील. यामुळे आपल्या सौरमालेबाहेरील पृथ्वीसदृश जगाच्या नव्याने आकलन होऊ शकेल. या मोहिमेचा आता केवळ प्रारंभ झाला आहे.’’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने