मकर संक्रांती नंतर येणाऱ्या किंक्रांतीची पौराणिक कथा काय आहे?

मुंबई: मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. पौष कृष्ण तृतीया हा दिवस म्हणजेच किंक्रांत यालाच आपण करिदिन ही म्हणतो. आजच्या लेखात आपण या दिवसा मागची कथा पाहणार आहोत.संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातोपौष महिन्यात सूर्यदेवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. सूर्य धनू राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला ‘भाकडमास’ असेही म्हणतात. तिळगुळाचा गोडवा आणि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष महिना हा सर्वांना हवाहवासा वाटतो.दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे साजरे केले जातात. तामिळनाडूमध्ये त्याला `भोगी पोंगल' असे म्हणतात. 

त्यादिवशी इंद्रपुजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती ऊतू जाऊ देतात. सूर्याला तसेच गणपतीला खीरीचा नैवेद्य दाखवतात. तसेच गायीला खीर खाऊ घालतात. महाराष्ट्रात तीळगुळाला जसे महत्त्व आहे, तसे दक्षिणेत खीरीला महत्त्व आहे. आपण किंक्रांत साजरी करतो, तर दक्षिणेत मुट्टु पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो.किंक्रांत हा विजय उत्सव आहे. पण या दिवसाला पंचागामधे अशुभ मानतात. पंचांगानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी "गुरु" विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. साखरपुडा, लग्ने, मुंज, सुपारी अशी शुभ कार्ये करत नाहीत. तसेच गाडी, घर खरेदीही करत नाहीत. या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. तिळाच्या पोळ्या करण्याची प्रथा आहे. किंक्रांत ह्या दिवशी तीळ व गूळ आपल्याला खाण्यात यावा याचे नियोजन आपले ऋषी मुनी पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी, कडाक्याच्या थंडीपासून आपलेसंरक्षण करणे ह्या हेतूनेच हे सण साजरे करण्याचे ठरवले असावे.
 या सणामागचा उद्देश संसारी स्त्रियांना पण घराबाहेर निघता यावे, चार्चौघींशी बोलता यावे, गप्पा मारता यावे, हाच असावा. एक श्लोक आहे बघा,

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।

तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।"

म्हणजेच, मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात, हव्यकव्ये (यज्ञात देवतांना अर्पित केलेली आहुती म्हणजे हव्य आणि पितरांना अर्पित केलेली आहुती म्हजे कव्य) करतात. त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो.यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. उत्तरायणात राशीनुसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो. या दिवसापासून दिनमान मोठं होण्यास सुरुवात होते. म्हणजेच, अंधार कमी होऊन प्रकाशाचं पर्व सुरू होतं. या दिवशी आपण तिळगुळ वाटून स्नेह वाढवतो,  गोडवा पसरवतो, आपल्या मित्रांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतो, गगनात पतंग उडवून आनंद साजरा करतो.

संक्रांत अशुभ असते असा एक समज आहे. एखादी वाईट घटना घडली की  "संक्रांत ओढवली"  अस म्हणणं हे योग्य नाही. मुळात आपला हा सण पर्यावरणपूर्वक आहे. या काळात सूर्य स्नान आणि समुद्र स्नान करण्याचीही प्रथा आहे. हळदी कुंकू समारंभामधून एकोपा, स्त्रियांचं एकीकरण होत, सामाजिक समरसता वाढीस लागते, स्त्रियांचा ताण तणाव कमी होतो. आजचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. या काळात मन दोलायमान स्थितीत असते. नात्यातील संक्रमणावस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न, भाव भावनांचा गुंता, नात्यांचा गुंता त्यातील संक्रमणाचा अतिवेग यामुळे आज जीवन ढवळून निघत आहे. आपले मन चांगल्या अवस्थेमध्ये जावं म्हणून आपण तिळगुळ देतो, ज्यामधून आपल्याला स्निग्धता ,उष्णता मिळते. सकारात्मकता लाभते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने