नवखा येतो...कोंडीत सापडतो

कोल्हापूर : दुतर्फा दुचाकी वाहनांचे पार्किंग, त्यातच मध्येच चारचाकी उभी केलेली. या रस्त्यावरून अवजड वाहन नव्हे, चारचाकी जरी समोरासमोर आली तरी रस्ता पॅक. दोन्ही वाहने एकमेकांना कोठे घासणार नाहीत, याची दक्षता घेण्याबरोबरच बाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांकडेही लक्ष आवश्‍यक. पादचारी जर सतर्क नसेल, तर चारचाकीचा धक्का बसलाच म्हणून समजा. शहरातील अशा अरुंद रस्त्यांवरून रोज हजारो वाहने प्रवास करतात. सवयीची माणसे कोंडीच्या कचाट्यातून सुटतात. सापडतो तो नवखा. ‘हे रोजचेच....’ म्हणून काहीजण दुर्लक्ष करत असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने हे सारेच चिंतेचे आहे...

दुतर्फा पार्किंगने अडले पादचारी

सकाळी साडेदहाची वेळ. नोकरदार, मुलांना शाळेत सोडायला निघालेले पालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी नंगीवली चौकापासून मंगळवार पेठेत जाणारा रस्ता भरून गेलेला. बजापराव माने तालमीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना परिसरातील रहिवाशांच्या दुचाकी उभ्या. हा भाग जरा प्रशस्त वाटत असला, तरी कैद्यांच्या शेतीकडून येणाऱ्या वाहनांमुळे तेथील कोपऱ्यावर वाहने अडत होती.तेथून पुढील रस्त्यांवर अनेक जुनी घरे असल्यामुळे अनेकांचे उंबरे गटारीपर्यंत आलेले. त्यामुळे त्यांची वाहने उभी करायला रस्त्याशिवाय जागाच नव्हती. नव्या इमारतींनी रस्त्यापासून सोडलेली जागा पार्किंगसाठी वापरलेली. तेथील वाहनांच्या पलीकडून म्हणजे रस्त्यावरूनच पादचारी जात होते.त्यातच समोरून केएमटी बस आली. पलीकडून जाणाऱ्या वाहनांना जागा देताना ती अगदी डाव्या बाजूला घासून जात होती. त्यामुळे एक पादचारी पार्किंग केलेल्या दोन दुचाकीमधील जागा शोधून उभा राहिला. शाहू बॅंक चौकापासून साई मंदिराजवळ जाईपर्यंत दोन्ही बाजूंना रस्त्यालगत असलेली दुकाने. मंदिराजवळील रस्त्याचा भाग तर आणखीच चिंचोळा झालेला.एका बाजूला मंदिर, शेजारी चहावाला, तर समोर किराणा माल, बेकरी. तेथे जाणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच. केएमटी बस आली की तेथे वाहनधारकांचा, पादचाऱ्यांचा उडणारा गोंधळ अंगावर काटा आणतो. केव्हा कोठे कोणत्या वाहनाचा धक्का लागेल, याचा नेम नाहीविक्रेते, वडापवालेही...

तेथून पुढे जायला निघाल्यानंतर कोळेकर तिकटी बसस्टॉपजवळ प्रवासी पहायला मिळाले. त्यांच्या काही अंतरावरच दोन वडापच्या रिक्षा उभ्या होत्या, त्याही रस्त्यातच. बस आल्यानंतर काय होते पाहण्यासाठी काही क्षण थांबलो. बस आली तरी ते रिक्षावाले जागेवरून हलले नाहीत. बस रस्त्यातच उभी राहिली. त्यामुळे साहजिकच पलीकडून येणाऱ्या वाहनांना जाणाऱ्या बाजूला उभ्या वाहनांमुळे अतिशय कमी जागा राहिलेली.चारचाकी वाहनधारकांच्या हातात ती बस जाण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरे काही नव्हते. तेथून पुढे जातो तर कोळेकर तिकटीजवळील विजेच्या खांबालगत एक भाजीविक्रेता बसलेला. दुसऱ्या बाजूला वडापाववाले. त्या साऱ्यांतून वाहनधारक जात होते; पण पादचारी जीव मुठीत धरून दुकानाच्या पायऱ्यांचा आधार घेऊन ये-जा करत होते. शिंगोशी मार्केटजवळ शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपस्थित होते; पण ते रस्त्यालगत उभ्या दुचाकीस्वारांना हटकताना दिसलेच नाहीत.

पर्यटकांचे चेहरे बोलले

मारुतीचे मंदिर ओलांडल्यानंतर मिरजकर तिकटीला आल्यानंतर जरा तुलनेने मोकळे-ढाकळे वाटले. दैवज्ञ बौर्डिंगमार्गे खरी कॉर्नरकडून बिनखांबी गणेश मंदिरजवळ आलो. रस्त्यावर अनेक पर्यटक, ज्येष्ठ नागरिक होते. लहान मुले, महिला पर्यटक वाहतुकीच्या गर्दीने कावरेबावरे होताना दिसले. मुंबईहून दर्शनासाठी आलेले एकनाथ पाटणे यांनी हा वाहतुकीचा खेळ पाहून प्रशासनाने कडक निर्णय घ्यायला पाहिजेत, असे सांगितले.सांगताना त्यांचे कोल्हापूरबाबत बनलेले मत चेहऱ्यावर दिसत होते. त्यांच्याशी संवाद साधून निवृत्ती चौकाकडे जाताना रस्त्यावर बहुतांश चारचाकी उभ्या केलेल्या, काहींवर धुळीचा थर साचलेला. शिवाजी पेठ तसेच सानेगुरुजी परिसराकडे ये-जा करण्यासाठीच्या या मार्गावर दोन्ही बाजूकडून दुचाकी, चारचाकींची रांग तुटत नव्हती. काहींनी आपल्या इमारतीसमोर वाहने उभी करू नयेत म्हणून अडथळे लावलेले. यामुळे माणसांनी चालायचे कोठून याचे उत्तर काही सापडत नव्हते.

वर्दळ व अडचणीचे रस्ते

पापाची तिकटी ते जुना बुधवार पेठ

सिद्धार्थनगर कमान ते तोरस्कर चौक

रंकाळा टॉवर ते रंकाळा एसटी स्टॅंड

रंकाळा स्टॅंड ते निवृत्ती चौक

पाण्याचा खजिना ते बिनखांबी गणेश मंदिर

खॉंसाहेब पुतळा ते बिंदू चौक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने