‘पालकमंत्री केसरकर चले जाव’ आंदोलन उद्या

कोल्हापूर : दलित वस्त्यांच्या निधीला स्थगिती देऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वंचित घटकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. २७) दुपारी १२ वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाजवळ ‘पालकमंत्री चले जाव’ आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे विलास कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी देवणे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेवर २० मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून संजयसिंह चव्हाण कार्यरत आहेत. त्यांनी अनेक जुन्या आणि पारंपरिक योजना बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जिल्ह्यातील अशा वस्त्यांची यादी तयार केली, ज्यांना अल्प विकासनिधी मिळाला आहे. त्यानुसार समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी बाराही तालुक्यातील वस्त्यांची यादी तयार केली. या वस्त्यांसाठी ३९ कोटींचा निधी देण्याचा निर्णय झाला. त्याला प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली.मात्र, पालकमंत्री केसरकर यांनी या सर्व वस्त्यांच्या निधीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा विकास खुंटणार आहे. यामुळे आम्ही ‘पालकमंत्री चलेजाव’ आंदोलन करणार आहोत. वंचित बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना राज्यात एकत्र आल्याने एकत्रित आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.’ या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संजय पवार, दयानंद कांबळे, संतोष सुक्कडे, महादेव कांबळे, मिलिंद पोवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने