'सर्जिकल स्ट्राइक'चा वाद पेटला; काँग्रेसनं भाजपकडं मागितला 'हा' पुरावा, सरकारच्या भूमिकेकडं लक्ष

नवी दिल्ली : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकवर  उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता राशिद अल्वी यांनीही याबाबतचे पुरावे मागितले आहेत.काँग्रेस नेते रशीद अल्वी म्हणाले, माझा सुरक्षा दलांवर  पूर्ण विश्वास आहे, पण भाजप सरकारवर विश्वास नाही. यासोबतच त्यांनी याबाबतचा व्हिडिओ जारी करण्याची मागणी सरकारकडं केलीये.

'दिग्विजय सिंहांचं काहीही चुकीचं नाही'

रशीद अल्वी पुढं म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी सरकारला विचारलेल्या प्रश्नांबाबत काहीही चुकीचं नाही. सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ सरकारकडं असेल तर तो दाखवावा, असं काँग्रेस नेत्यानं म्हटलंय. दिग्विजय सिंह सरकारला व्हिडिओ दाखवायला सांगत आहेत त्यात काय चूक? आम्ही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत नाही, पण सरकारनं आपल्या दाव्याचा व्हिडिओ दाखवावा, असंही त्यांनी म्हटलंय.
'भाजपनं व्हिडिओ दाखवावा, अन्यथा माफी मागावी'

अल्वी म्हणाले, भाजप नेहमीच खोटे बोलतो आणि त्यात माहिर आहे. पाकिस्तानवर लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आम्ही प्रश्न उपस्थित करत नाही, फक्त व्हिडिओ तो मागत आहोत. भाजप सरकारकडं व्हिडिओ नसेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने