स्वाभिमानी’चा २२ ला चक्काजाम; राजू शेट्टींची घाेषणा

कोल्हापूर : ऊस तोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान, यासह विविध प्रश्‍ंनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवारी (ता. २२) राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.दरम्यान, बारावीच्या परीक्षा असल्याने हे आंदोलन दुपारी बारा वाजता होईल, त्यात राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन होणार नाही. तालुक्याच्या पातळीवरील राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग रोखून धरले जातील, अशी माहिती श्री. शेट्टी यांनी दिली.

शेट्टी म्हणाले, ‘ऊस तोडणी वाहतूकदरांचा प्रश्न जटिल बनला आहे. राज्यात ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे; पण तोडणी मजुरांची संख्या मात्र कमी होत आहे. याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २२ जिल्ह्यांतील ४४६ कोटी रुपयांची मुकादमांनी फसवणूक केली आहे.’याशिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीज बिल दुरुस्त करून देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित ३७ टक्के वीज वाढ रद्द करावी, आदी मागण्याही करण्यात येणार आहेत. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना

राज्य पातळीवरील स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. या संघटनेमार्फत ऊस तोडणी कल्याण महामंडळाकडून आता मजुरांची नोंदणी करून कारखान्यांना मजूर पुरवावेत, वाहतूकदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करताना स्थानिक पोलिसांनी सखोल चौकशी करावी, टोळ्या पळालेल्या वाहतूकदारांच्या मागचा बँकेचा ससेमिरा कमी करावा, हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आमच्याकडेही तणनाशक आहे

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असले तरी आमच्याकडेही तणनाशक आहे. त्यावर ‘कमळ’ टिकणार नाही, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने