अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’च्या सिक्वलची घोषणा; पुन्हा बघायला मिळणार ज्युनिअर बच्चनचा दमदार अभिनय

मुंबई : शेअर मार्केटचा बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहता याच्या स्कॅमवर २ कलाकृती सादर झाल्या, त्यापैकी एका चित्रपटात अभिषेक बच्चनने हर्षद मेहताची भूमिका निभावली होती. हा चित्रपट सुरुवातीला मोठ्या पडद्यावर येणार होता, पण कोविडमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला, आता २०२१ साली प्रदर्शित झालेल्या या ‘बिग बुल’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे.चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी अभिषेक बच्चनच्या वाढदिवसाआधीच ही मोठी बातमी जाहीर केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, “या चित्रपटाच्या सीक्वलविषयी माझ्याकडे बऱ्याचदा विचारणा झाली होती. आता मात्र यावर काम सुरू आहे आणि लवकरच हा सिक्वल आम्ही घेऊन येत आहोत हे सांगताना मला खूप आनंद होत आहे.”हा सीक्वल एका पुस्तकाच्या आधारावर बेतलेला असू शकतो. शिवाय अभिषेक बच्चनबदल बोलताना आनंद पंडित म्हणाले, “मला एक असा चित्रपट करायचा आहे ज्यात अभिषेक बच्चनच्या टॅलेंटला योग्य न्याय मिळेल. 

तो एक अप्रतिम नट आहे आणि त्याच्याबरोबर काम करायला मी कायम उत्सुक असतो, या सीक्वलमधून एक वेगळी जादू अनुभवायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो.” हा चित्रपटसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच ओटीटीवर प्रदर्शित होणार की मोठ्या पडद्यावर याबद्दल अजून खुलासा झालेला नाही.‘बिग बुल’ हा चित्रपट २०२१ साली डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. यात अभिषेकबरोबर इलीयाना डीक्रूझही महत्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटाआधी २०२० मध्ये ‘स्कॅम १९९२ – अ हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि प्रेक्षकांनी या सीरिजला तेव्हा अक्षरशः डोक्यावर घेतलं, यामुळेच हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नव्हता असं म्हंटलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने