मुंबई: अभिनेता - दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्र शाहीर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. परंतु हा महत्वाकांक्षी सिनेमा रिलीज होण्याच्या आधी केदार शिंदेंवर मोठं संकट कोसळलं आहे.यासाठी केदार शिंदेंना प्रचंड दुःख झालं असून त्यांच्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्याची वेळ आलीय. काय घडलंय नेमकं बघुया...केदार शिंदे यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय. एका तरुणाने केदार शिंदेंच्या अकाउंटवर स्वतःचे फोटो आणि प्रोफाइल पिक्चर पोस्ट केलेत. केदार शिंदे यांनी केलेल्या सर्व पोस्ट यामुळे डिलीट झाल्या आहेत.महाराष्ट्र शाहीर सिनेमाचं रिलीज तोंडावर आलं असताना केदार शिंदे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रमोशनसाठी विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होते. पण आता त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक होऊन नंतर ते डिलीट झालंय.
सहा महिन्यात दुसऱ्यांदा हि धक्कादायक घटना घडली आहे. केदार शिंदे यांनी याविषयी रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.केदार शिंदे यांनी नवीन अकाउंट ओपन केलं असून त्यांची लेक सना शिंदे हिने याविषयी माहिती दिलीय. केदार शिंदेंच्या बाबतीत दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून त्यांनी याआधीही सर्वांना सावधान रहे सतर्क रहे असा इशारा दिला होता.केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण काल १५ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. शाहिरांची धगधगती जीवनगाथा महाराष्ट्र शाहीर सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे.अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी केली आहे.