भाजप CM शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत? शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या

ठाणे: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. अनुराग ठाकूर यांचा हा एकदिवसीय दौरा असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असून भाजपने महाराष्ट्रातील एकूण 16 लोकसभा मतदर संघावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. या लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे.तर कल्याण हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा या मतदार संघात येत असल्यामुळे भाजप या मंतदार संघावर दावा करणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.१४ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या अनुराग ठाकूर पुन्हा एकदा कल्याण मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे का? शिवाय कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं काय होणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.अनुराग ठाकूर यांच्या या दौऱ्याची माहिती भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभेचा दुसऱ्यांदा दौरा होत आहे. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून नेमलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अनुराग ठाकूर आहेत. याच पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर यांचा एकदिवसीय दौरा आहे. मागील वेळी त्यांचा दौरा तीन दिवसांचा होता.”उद्या (१४ फेब्रुवारी रोजी) अनुराग ठाकूर यांचा सकाळपासून दौरा सुरू होणार आहे. कळवा, मुंब्रा भागातून सकाळी नऊ वाजल्यापासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पक्षाअंतर्गत संघटनात्मक बैठका आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह सर्व सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत अनुराग ठाकूर दोन ते तीन दौरे करणार आहेत,” अशी माहिती संजय केळकर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने