बीएमसीचं बजेट सादर करणारे आयुक्त इक्बाल सिंह चहल कोण आहेत?

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू प्रशासक व आयुक्त इक्बाल चहल आज महापालिका मुख्यालयातील सभागृहात सादर करणार आहेत. मुंबई शहरासाठी व मुंबईकरांसाठी कोणकोणत्या हितकारक योजना, प्रकल्प, विकासकामे करणार याबाबतची माहिती देतील.यंदाचे आर्थिक वर्ष मुंबईकरांसाठी कसे असेल याची पदरात नेमके काय काय पडणार आहे, याचा उलगडा आज आयुक्त चहल करणार आहेत. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.

मुंबईत विशेषत: धारावीत त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी खास उपाययोजना केल्या. त्यामुळे त्यांचं खूप कौतुकही झाले होते. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहुया.इक्बालसिंह चहल हे सध्या मुंबई महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 1989 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी ते जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव होते. त्यांचा जन्म 20 जानेवारी 1966 झाला. राजस्थानमधील जोधपूर येथे चहल यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी जन्‍मलेले इक्बाल चहल यांनी बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत 96 टक्‍के गुणांसह राष्‍ट्रीय गुणवत्‍ता यादीत स्‍थान पटकावले होते. इलेक्‍ट्रॉनिक्‍स अॅण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादित केली.महत्वाची पदे भुषवली

इक्बालसिंह चहल यांनी 1989 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला. भारतीय प्रशासकीय सेवेचा 31 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या इक्बाल चहल यांनी नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने भुषवली आहेत.चहल यांनी आजवर केकेल्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च 2013 ते मार्च 2016 या कालावधीमध्‍ये सोपवण्यात आली होती.

पुरस्कारांवर कोरले नाव

गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्‍याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरी आधारे जानेवारी 2018 मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार प्राप्‍त झाला. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय इ-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार 2002 देखील मिळाला आहे.फेब्रुवारी 2019 मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार देखील मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्‍ये 2004 ते 2018 पर्यंत सलग 21 किमी अंतराच्‍या हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणूनदेखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने