राजनाथ सिंह, अमित शाह, स्मृती इराणी, नितीन गडकरी कुणाच्या खात्याला बजेटमध्ये काय मिळालं?

दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी ४५ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलने हा अर्थसंकल्प ८ टक्क्यांनी जास्त आहे. २०२२-२३ या वर्षात सरकारने ३९.४४ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. आपण जाणून घेणार आहोत की या अर्थसंकल्पातून राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह, स्मृती इराणी या दिग्गज मंत्र्यांच्या खात्यांसाठी किती तरतूद केली गेली आहे? आपण जाणून घेऊ.

संरक्षण मंत्रालयासाठी सर्वाधिक तरतूद

संरक्षण मंत्रालयासाठी सर्वात जास्त तरतूद करण्यात आली आहे. शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी आणि आधुनिकीकरणासाठी १.६२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शस्त्रांच्या खरेदीसाठी १० हजार कोटी वाढवण्यात आले आहेत. या निधीचा उपयोग लढाऊ विमानं, युद्ध आणि शस्त्रांच्या खरेदीसाठी करण्यात येतो. संरक्षण खात्याचा निवृत्ती वेतनाचा खर्च वाढला आहे. २०२२-२३ मध्ये संरक्षण खात्याच्या पेन्शसाठी १.१९ लाख कोटींचा निधी देण्यात आला होता. आता २०२३-२४ मध्ये हा निधी वाढवून १.३८ लाख कोटी इतका करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या गेल्या त्यातले १९ हजार कोटी रुपये पेन्शन खात्यासाठी आहेत.

नितीन गडकरी आणि अमित शाह यांच्या खात्यांसाठी काय तरतूद?

नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि परिवहन खातं आहे. तर अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. नितीन गडकरींच्या खात्याला २.७० लाख कोटी रुपये मिशाले आहेत. संरक्षण मंत्रालयानंतर सर्वाधिक निधी तरतूद झालेलं हे खातं ठरलं आहे. तर अमित शाह यांच्या गृह मंत्रालयासाठी १.९६ लाख कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. यातला ६५ टक्के निधी म्हणजे जवळपास १.२७ लाख कोटी रुपये पोलिसांवर खर्च केले जाणार आहेत.



निधी तरतुदीच्याबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे रेल्वे खातं

संरक्षण खातं, रस्ते आणि परिवहन खातं यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे ते म्हणजे रेल्वे खातं. रेल्वे खात्यासाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २.४१ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव हे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेल्या रेल्वे खात्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. चौथ्या क्रमाकांवर खाद्य आणि सार्वजनिक वितरण खातं आहे. या खात्यासाठी २.६ लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

स्मृती इराणी यांच्या खात्याला काय मिळालं?

स्मृती इराणी यांच्याकडे महिला बालविकास आणि अल्पसंख्याक खातं आहे. निर्मला सीतारमण यांनी महिला आणि बालविकास मंत्रालयासाठी २५ हजार ४४८ कोटींची तरतूद केली आहे तर अल्पसंख्याक खात्यासाठी ३ हजार ९७ कोटींची तरतूद केली आहे. निर्मला सीतारमण यांनी अर्थ खात्यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १.६८ लाख कोटींची तरतूद केली आहे. तर परराष्ट्र मंत्रालयासाठी १८ हजार ५० कोटींची तरतूद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने