मुंबई: ‘बिग बॉस १६’ शोचा विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने पटकावलं. एमसीबरोबरच या शोमधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचं स्थान मिळवलं. यामधीलच एक स्पर्धक म्हणजे अर्चना गौतम. अर्चना ‘बिग बॉस १६’च्या टॉप ४ स्पर्धकांपैकी एक होती. तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्चनाने सांगितलं की, “माझी आर्थिक परिस्थिती याआधी नीट नव्हती. रिकामी सिलेंडर घरपोच करण्याचं काम मी करत होते. एका सिलेंडरचे मला १० ते २० रुपये मिळायचे. सायकल किंवा बाईकवर मी सिलेंडर घरोघरी पोच करायचे. टेलीकॉलिंगमध्ये मी पहिली नोकरी केली.”
“तेव्हा मला ६००० रुपये पगार होता. मला इंग्रजी भाषा येत नव्हती. म्हणून हिंदी भाषेमध्ये मी सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे. पण कोणीच माझा फोन उचलायला तयार नव्हतं. या कारणामुळेच मला नोकरीवरुनही काढण्यात आलं. कारण माझ्याकडून त्या कंपनीला काही काम मिळत नव्हतं. त्यानंतर पुन्हा १० ते १२ हजार रुपयांमध्ये मी दुसरी नोकरी केली.”मुळ उत्तरप्रदेशमधल्या मेरठमध्ये राहणाऱ्या अर्चनाने शेवटी ज्या कंपनीमध्ये नोकरी केली ती कंपनीही बंद झाली. त्यानंतर ती पुन्हा मेरठला गेली. रवि किशन यांच्या शोमध्ये सहभागी होण्याची संधी अर्चनाला मिळाल्यानंतर तिचं नशीब बदललं. २०१४मध्ये तिने मिस उत्तरप्रदेशचा किताब पटकावला. तसेच २०१८मध्ये मिस बिकिनी इंडियाचं विजेतेपद तिला मिळालं. आता ‘बिग बॉस १६’मुळे तिला खरी ओळख मिळाली.