मुंबई: राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी राज्याच्या सत्तासंघर्षामध्ये राज्यपालांची भूमीका काय होती याबद्दल युक्तीवाद केलाजुने विधानसभ अध्यक्ष आणि नवे विधानसभा अध्यक्ष त्यांचे अधिकार आणि आमदार अपात्रतेबाबदचा त्यांचा निर्णय या सगळ्यांवर सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तसेच राज्यपालांनी नियम डावलून शपथ दिली असेही सिब्बल म्हणाले.यावेळी सिब्बल यांनी राज्यपालांचा हेतू आणि भूमीकेविषयी संशय व्यक्त केला. ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला नव्हता, त्यामुळे राज्यपालांनी शिंदेंना बहुमत सिध्द करण्यासाठी बोलवलं हे चुकीचं असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. यावेळी राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरला तर सरकारच जाईल असेही सिब्बल म्हणाले.
राज्यपालांच्या कृतीवर सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेला राज्यपालांनी परवानगी दिली यावर सिब्बलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी बोलावलं. पण तोपर्यंत शिवसेना कोणती हे देखील निश्चित झालं नव्हतं. तसेच राज्यपालांना हे ठरवण्याचा राज्यघटनेनुसार अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी केलेली कृती घटनाविरोधी होती.राज्यपालांनी शिंदे गटाला सत्तास्थापनेसाठी पाचारण करून एकप्रकारे शिवसेनेतील फुटीलाच मान्यता दिल्याचे सिब्बल म्हणाले. सरकार स्थापन झालं, तोपर्यंत शिवसेनेतील फुटीचा कोणताही उल्लेख नव्हता. तोपर्यंत शिवसेना हा एक पक्ष होता आणि उद्धव ठाकरे त्याचे अध्यक्ष होते.पण राज्यपालांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंना विचारलंच नाही की तुम्ही भाजपाला पाठिंबा देताय की नाही? त्यामुळे एकनाथ शिंदेंना पाचारण करून राज्यपालांनी पक्षातल्या फुटीला मान्यताच दिली, ज्याचा त्यांना घटनेनं अधिकार दिलेला नाही असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.राज्यपालांनी कोणत्या आधारावर फुटीर गटाचा सरकार स्थापनेचा दावा मान्य केला? याचा निर्णय न्यायालयाने घेतला, तर बाकी सगळे प्रश्न सुटतील असेही सिब्बल म्हणाले आहेत.