निम्म्या ऊर्जेचा वापर आशिया खंडातच

बर्लिन : आशिया खंडातील देशांमध्ये ऊर्जेचा वापर वाढला असून, २०२५ पासून जगभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी निम्मी ऊर्जा एकट्या आशिया खंडात वापरली जाईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) वर्तविला आहे. आफ्रिका खंडाची लोकसंख्या अधिक असली तरी त्या तुलनेत त्यांच्याकडून ऊर्जेचा होणारा वापर कमीच आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.आशियामध्ये चीनकडून ऊर्जेचा सर्वाधिक वापर होतो. २०१५ मध्ये जगभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी एक चतुर्थांश ऊर्जा एकट्या चीनमध्ये वापरली जात होती. हे प्रमाण २०२५ पर्यंत एक तृतियांशपर्यंत वाढेल, असा अंदाज ‘आयईए’ने वर्तविला आहे.युरोप, अमेरिका आणि भारताकडून वापरल्या जाणाऱ्या एकत्रित ऊर्जेपेक्षाही चीनचा वापर अधिक असेल, असे ‘आयईए’ने म्हटले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वीजेचा वापर पाहता आफ्रिका खंडात फारच कमी ऊर्जा वापरली जाते. जगाच्या एक पंचमांश लोकसंख्या असलेल्या या खंडात २०२५ मध्ये वीजेचा वापर तुलनेने केवळ तीन टक्के असेल. याचाच अर्थ, आफ्रिकेमध्ये अजूनही बऱ्याच मोठ्या भागाचे विद्युतीकरण झालेले नाही.अणूऊर्जेचा वापर वाढणार

आगामी तीन वर्षांत ऊर्जेचा वापर वाढणार असून या वाढलेल्या ऊर्जेत अणु ऊर्जा आणि पवन, सौर अशा अपारंपरिक ऊर्जेचे प्रमाण अधिक असेल, असा अंदाज ‘आयईए’ने व्यक्त केला आहे. यामुळे वीज क्षेत्राकडून होणाऱ्या हरित वायू उत्सर्जनात घट होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऊर्जेचा वापर आणि मागणी ही आता वातावरणातील बदलावरही अवलंबून रहात असल्याबाबतची चिंताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

‘राज्यात सहा वर्षांत एकही प्रकल्प नाही’

लखनौ : उत्तर प्रदेशमधील सहा वर्षांच्या सत्ताकाळात राज्यात एकही नवा प्रकल्प आणण्यात भाजपला अपयश आल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. लखनौमध्ये गुंतवणूकदारांची जागतिक परिषद होणार असून त्यापार्श्वभूमीवर अखिलेश यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत भाजपवर निशाणा साधला आहे.समाजवादी पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळातच सुरु झालेले प्रकल्प आपले म्हणून भाजप सर्वांना सांगत आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. ‘‘लखनौमधील कारंजे, उद्याने या सरकारने पुन्हा सुरु केले. ही उद्याने आमच्याच सरकारने विकसीत केली होती. गोमती नदीच्या किनाऱ्याचा विकासही आम्हीच केला होता.आमचे प्रकल्प आधी बंद केले आणि आता पुन्हा चालू करून ते नवेच आहेत असे भासविले जात आहे. वास्तविक, गेल्या सहा वर्षांत राज्यात एकही नवीन प्रकल्प आलेला नाही. स्वत:ची स्तुती करण्यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि हा पैसा जनतेकडूनच वसूल केला जात आहे. भाजपने बसभाडे २४ टक्क्यांनी वाढविले. भाजप हा श्रीमंतांचा मित्रपक्ष असून स्वत:च्या भ्रष्टाचाराचे ओझे ते सामान्य जनतेवर लादत आहेत,’’ अशी टीका अखिलेश यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने