आता पोलिस साधताहेत थेट जनतेशी संवाद

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलांची फसवणूक होऊ नये, अफवेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, संशयितांची माहिती मिळावी यासाठी पोलिस थेट जनतेत जात आहेत.यासाठी पोलिस आता कोपरा सभा, दंगल काबू योजना, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीच्या माध्यमाचा वापर करत आहेत. एखादी घटना होण्यापूर्वीच कळाली तर ती नियंत्रणात आणणे शक्य असल्यामुळे पोलिसांकडून प्रबोधनासह जनजागृती थेट नागरिकांत जाऊन होत आहे.मागील महिन्यात आर. के. नगरमध्ये चोरी झाली. पोलिसांनी तातडीने सायंकाळीच तेथे कोपरासभा घेतली. ज्येष्ठांची फसवणूक होताना दिसल्यावर ज्येष्ठ नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून एटीएम कार्डच्या सुरक्षेपासून तोतया पोलिसांसह कसा बचाव करायचा याबाबत माहिती दिली. जातीय सलोखा राहण्यासाठी थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम पोलिसांनी यशस्वी केला आहे.स्थानिक नागरिकांत पोलिस आपले मित्र आहेत ही भावना जागरुक करण्यासाठी ‘पोलिस मित्र’ बनविले जात आहेत. यातून एखादा परिसरात संशयास्पद परिस्थिती वाटल्यास त्याची माहिती पोलिसांना तातडीने मिळत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे उपक्रम सुरू आहेत.ओटीपी नंबर देऊ नये, दागिने पॉलिशच्या आमिषाला बळी पडू नये, रस्त्यात कोणी पत्ता विचारला तर त्यांच्यापासून पाच फुटांहून अधिक अंतरावर राहावे, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, काही दिवस परगावी जाणार असाल तर त्याची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी. त्या परिसरात गस्त वाढविण्यास मदत होते, अशा पद्धतीचे प्रबोधनही कोपरा सभेसह इतर ठिकाणी केले जात आहे.स्थानिक नागरिकांना पोलिस आपले मित्र, असे वाटले पाहिजे. पोलिसांना स्थानिक नागरिकांची ओळख पाहिजे यासाठी थेट पोलिस जनतेशी एकरूप झाले पाहिजेत. त्यासाठीच कोपरा सभा, पोलिसमित्र आशा उपक्रमातून पोलिस आणि जनता एकत्रित येत आहे. त्याचा फायदा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने