डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ? कुठेच सापडेना!

मुंबई: स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलावरुन झालेल्या मतभेदांमुळे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा हा राजीनामा ११ ऑक्टोबर १९५१ रोजी मंजूरही झाला होता. मात्र आता हा राजीनामा कायदेशीर रेकॉर्डमधून गायब झाला आहे.'द हिंदू'चा दाखला देत जनसत्ताने याविषयीचं सविस्तर वृत्त दिलं आहे. प्रशांत नावाच्या एका व्यक्तीने माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत डॉ. आंबेडकर यांच्या राजीनाम्याची प्रत मागवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री या पदाचा राजीनामा का दिला, अशी माहिती त्यांनी या याचिकेत मागवली होती.पंतप्रधान कार्यालयाकडून प्रशांत यांनी ही माहिती मागवली होती. पंतप्रधान कार्यालयाने त्यांची याचिका कॅबिनेट सचिवालयाकडे पाठवली आणि डॉ. आंबेडकर यांचा राजीनामा ११ ऑक्टोबर १९५१ रोजी स्विकारल्याचं प्रशांत यांना सांगितलं. मात्र या व्यतिरिक्त अधिक माहिती सचिवालयाला देता आली नाही. कार्यालयाकडे ही माहिती नाही, असं सांगण्यात आलं.त्यानंतर भारतातल्या तीन प्रमुख कार्यालयांकडे ही याचिका गेली. पण कोणत्याही कार्यालयाकडे ही माहिती सापडली नाही. त्यानंतर प्रशांत यांनी केंद्रीय सूचना आयोगाकडे याचिका केली आहे. आयोगाने सांगितलं की, भारताच्या पहिल्या कायदेमंत्र्याचा राजीनामा पंतप्रधान कार्यालय किंवा राष्ट्रपती सचिवालयाच्या रेकॉर्ड्समध्ये असायला हवं. मात्र दोन्ही कार्यालयांनी जबाबदारी एकमेकांकडे सरकवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने