अदानी वादावर विरोधकांचा गदारोळ! चर्चेची मागणी करताच दोन्ही सभागृह तहकूब

दिल्ली: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गुरुवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.राज्यसभेत देखील गोंधळ पाहायला मिळाला. येथे खासदारांनी गदारोळ केल्याने सभापती जगदीप धनखर यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. हिंडेनबर्ग अहवालासह अनेक मुद्द्यांवर संसदेत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. हिंडेनबर्ग अहवालावर संसदेत चर्चेची मागणी विरोधकांनी केली होती. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की, आर्थिक दृष्टिकोनातून देशात घडणाऱ्या घटना सभागृहात मांडल्या पाहिजेत. म्हणून आम्ही नोटीस दिली होती. आम्हाला या नोटीसवर चर्चा हवी होती पण आम्ही जेव्हा-जेव्हा नोटीस देतो तेव्हा ती फेटाळली जाते.ज्यांचे पैसे एलआयसी किंवा इतर संस्थांमध्ये आहेत. त्यांचा पैसा कसा वाया जात आहे यावर सभागृहात चर्चा करू, असे आम्ही ठरवले आहे. लोकांचे पैसे काही कंपन्यांना दिले जात आहेत, अशा बातम्यांमुळे कंपनीचे शेअर्स पडले आहेत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने