आफ्रिकेतील किलीमांजरोवर फडकला भगवा,सर्वोच्च शिखरावर शिवरायांचा जयघोष

कोरेगाव : येथील तरुण गिर्यारोहक समीर मालुसरे याने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो (१९३४१ फूट) सर केले. या मोहिमेत त्याने शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा शिखरावर नेऊन भारतीय तिरंग्यासह भगवा ध्वज फडकवला.समीरने १५ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता पाच सहकाऱ्यांसह मोहिमेला प्रारंभ केला. तीन दिवसांची आगेकूच करत त्याने शिखरावरील चढाई सुरू केली. वातावरणाचा त्रास जाणवू लागल्यानंतर मोहिमेतील पाचपैकी दोघे परत फिरले.मात्र, अंतिम टप्प्यातील सलग नऊ तास अत्यंत अवघड चढाई १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री सुरू करत किलीमांजारो शिखरावर सकाळी पोचून छत्रपती शिवरायांचा जयघोष करत समीरने आपल्या दोन सहकाऱ्यांसह ही मोहीम फत्ते केली.एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन केले होते. असंख्य अडथळे आणि अडचणी पार करत त्याने हे यश मिळवले. किलीमांजारो हे टांझानिया (आफ्रिका) देशातील शिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची १९३४२ फूट आहे. अवघड, सतत बदलते वातावरण, उणे १५ ते २० तापमान आणि उंच असलेले हे शिखर सर केल्याबद्दल समीरचे सर्वत्र कौतुक होत आहे.या मोहिमेच्या माध्यमातून ३६० एक्सप्लोररमार्फत त्यांनी सात महाद्वीपामधील पहिले शिखर सर केले आहे. पुढे बाकी महाद्वीपामधील उर्वरित सर्वात उंच सहा शिखरे सर करण्याचा त्याचा मानस आहे.या मोहिमेचा खर्च खूप मोठा होता, त्यासाठी समीरला कोरेगाव शहरात व जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्तींसह छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी, मित्रपरिवाराने मोठा सहयोग दिला.दक्षिण आफ्रिकेत जाऊन यशस्वी केलेल्या या मोहिमेत समीरला महाराष्ट्रातील तुषार सुभेदार, सागर कुंभारे, सुबोध वरघट व सागर बोडके यांची साथ लाभली.गिर्यारोहणाची आवड कायम जोपसणार आहे. यानंतर जगातील सातही खंडांतील सात सर्वोच्च पर्वतशिखरे सर करण्याचे आपले ध्येय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने