‘कांतारा २’साठी चाहते प्रचंड उत्सुक; चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची होणार एंट्री?

मुंबई:   २०२२ हे वर्षं कन्नड चित्रपटसृष्टीसाठी खास होतं. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला अन् पाठोपाठ आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टी रातोरात स्टार झाला. जानेवारी महिन्यात ‘कांतारा’ने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले.अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टी आणि होमबाले फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी यानिमित्त जंगी सेलिब्रेशन केलं. यादरम्यान रिषभ शेट्टीने ‘कांतारा २’बद्दल भाष्य केलं. ‘कांतारा २’ हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे असं रिषभने नमूद केलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या दुसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला दिसणार असल्याची चुकीची बातमी बाहेर आली होती.



‘न्यूज १८’मध्ये आलेल्या ‘डेक्कन हेराल्डच्या रीपोर्टनुसार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत या दुसऱ्या भागात दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रजनीकांत यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं भरपूर कौतुक केलं, शिवाय अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टीनेही रजनीकांत यांची भेट घेतली होती. अजूनही याबाबत काहीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपत आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे. रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने