केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दौऱ्यासाठी दिल्लीची टीम दाखल

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते जिल्हा दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री शहांच्या दौऱ्यामुळे थेट दिल्लीची टीम पोलिस अधीक्षक कार्यालयात आज दाखल झाली.त्यांच्याकडून पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे यांनीही आज नियोजनासंदर्भात पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. या बंदोबस्तातील शहांच्या दौऱ्यावेळीची रंगीत तालीमही होणार आहे. त्याचेही नियोजन पोलिस अधीक्षक कार्यालयातून सुरू झाले.



मंत्री शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही दौरे आहेत. मुख्यमंत्री आजऱ्याला असतील. विरोधी पक्षनेते अजित पवार कागल दौऱ्यावर आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपी जिल्हा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या ‘प्रोटोकॉल’प्रमाणे बंदोबस्ताच्या नियोजनासाठी थेट दिल्लीतील अधिकारी आज पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. दशहतवादविरोधी पथक (एटीएस) यांच्यासह अन्य पथकांकडून आणि थेट दिल्ली, मुंबईतून पोलिस अधीक्षकांशी संवाद सुरू झाला.प्रत्येक मंत्र्यांच्या ताफ्यात कोणकोणती वाहने असतील, कोण कोण प्रमुख पदाधिकारी असतील याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी पोलिस, महसूल, महापालिका, सार्वजनिक बांधकामचे कोण कोण अधिकारी असतील, याचेही नियोजन आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.

भेटीची परवानगी घेण्यासाठी धांदल
केंद्रीय मंत्री शहा यांना भेटण्यासाठी आगाऊ माहिती पोलिसांना द्यावी लागत आहे. त्यामुळे शहा यांचे नातेवाईक, मित्रमंडळींकडून त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक नातेवाईक, मित्रमंडळींकडून आजही पोलिस अधीक्षक कार्यालयात रांग लागली होती. भेटीसाठी थेट दिल्ली कार्यालयातून संमती घ्यावी लागते. त्यामुळे परवानगी घेण्यासाठी धांदल उडाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने