वाढत्या तापमानानं वाढवलं टेन्शन; केंद्राकडून सतर्कतेचा इशारा

दिल्ली: थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर आता देशातील अनेक भागात उन्हाचा कडाका वाढण्यास सुरूवात झाली आहे.वाढत्या तापमानात केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र लिहून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.पाठवलेल्या पत्रात उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच नॅशनल एक्श प्लानकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

पत्रात नेमकं काय?

आरोग्य सचिवांनी केंद्रशासित आणि राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशात काही ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ होत आहे, अशा परिस्थितीत उष्णतेमुळे होणारे आजारही वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रानं पत्र लिहून सतर्क केले आहे.1 मार्च 2023 पासून, सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमधील हवामान बदल आणि NPCCHH अंतर्गत उष्णतेशी संबंधित रोगांवर दैनंदिन निरीक्षण एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्मवर (IHIP) दिली जाईल.NPCCHH, NCDC, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या या पत्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तसेच सर्व राज्यातील जिल्हा आणि शहर आरोग्य विभागांना उष्णतेशी संबंधित आरोग्य कृती योजना पुन्हा लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.यासोबतच, राज्याच्या आरोग्य विभागांना वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्राउंड लेव्हल वर्कर्सना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापन याबाबत जागरूक करण्यास आणि क्षमता वाढीचे प्रयत्न सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे.याशिवाय उष्णतेशी संबंधित सर्व अत्यावश्यक औषधे, इंट्राव्हेनस फ्लुइड्स, आइस पॅक, ओआरएस आणि सर्व आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.तसेच सर्व आरोग्य सुविधांमध्ये पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने