असुरक्षित इमारतींमुळेच प्रचंड हानी

तुर्की: तुर्की आणि सीरियाला विनाशकारी भूकंपाचा धक्का बसल्याच्या घटनेला एक आठवडा पूर्ण झाला असला तरी ढिगारे उपसण्याचे काम अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येतही दररोज भर पडत असून ही संख्या सध्या ३३ हजारांच्या वर गेली आहे.दरम्यान, तुर्की सरकारने भूकंपात पडलेल्या इमारतींच्या एकूण १३० बांधकाम व्यावसायिकांना ताब्यात घेतले आहे अथवा त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. बांधकाम नियमांचा भंग करत इमारतींची उभारणी केल्यामुळेच जीवित हानीमध्ये मोठी भर पडली, असा आरोप तज्ज्ञांनी केला आहे.

भूकंपानंतर इमारती कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३,१७९ इतकी झाली असून एक लाखांहून अधिक जण जखमी झाले आहेत. ही जीवितहानी भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झाली असली तरी भ्रष्टाचार, नियमांचे उल्लंघन करून असुरक्षित ठिकाणी आणि दर्जाशी तडजोड करून इमारती उभ्या केल्यानेच या हानीमध्ये मोठी भर पडल्याची टीका होत आहे.भूकंपप्रवण क्षेत्रात रहात असलेल्यांना सुरक्षित घरे न दिल्याबद्दल बांधकाम व्यावसायिकांना दोषी ठरविण्यात आले असून एकूण १३० जणांना अटक वॉरंट बजावून त्यापैकी काहींना ताब्यातही घेण्यात आले आहे.

सरकारने पडलेल्या इमारतींसाठी वापरल्या गेलेल्या साहित्याचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली असून त्यांची तपासणी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपप्रवण भाग असल्याने तुर्कीमध्ये बांधकामासाठी काही नियम निश्‍चित करण्यात आले आहेत. मात्र, या नियमांची अभावानेच अंमलबजावणी केली जाते. त्यामुळेच बांधकामाचा खराब दर्जा असलेल्या आणि भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता नसलेल्या अनेक इमारती उभारल्या गेल्या आहेत. सोमवारी (ता. ६) ७.८ रिश्‍टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसताच या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आणि त्याखाली हजारो नागरिक गाडले गेले.खोल्या वाढविण्यासाठी तडजोड...

भूकंपानंतर जाग आलेल्या स्थानिक प्रशासनाने चौकशी केली असताना बांधकाम व्यावसायिकांनी केलेले अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. अनेक जणांनी खोल्यांची संख्या आणि आकार वाढविण्यासाठी इमारतीला आधार देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पिलरची संख्या कमी केल्याचे दिसून आले आहे.याशिवाय, बांधकाम साहित्यात भेसळीचे प्रकारही आहेत. भूकंपानंतर परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांनी इस्तंबूल विमानतळावरून अटक केली आहे.

रॉनेसान्स रेडिडेन्स बनले डेथ रेसिडेन्स

हताय प्रांतामधील रॉनेसान्स रेसिडेन्सी ही २५० अपार्टमेंटची इमारत मृत्युचा सापळा ठरली. जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली असंख्य नागरिक अडकले आहेत. ही लक्झरी श्रेणीतील गृहनिर्माण संस्था होती. मेहमेत यासर कोक्सुन या बांधकाम व्यावसायिकाने ती बांधली. इस्तंबूलहून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली. १२ मजली इमारतींचे बांधकाम २०१३ मध्ये पूर्ण झाले. त्यात बांधकामविषयक अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने