आजपासून सर्वसामान्यांना विधिमंडळ परिसरात बंदी

मुंबई: आजपासून राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. आज दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे. दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. आजपासून सर्वसामान्यांना विधिमंडळ परिसरात बंदी घालण्यात आली आहे. विधीमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे विधिमंडळ कार्यालयाकडून पास देण्यासाठी नकार देण्यात आला आहे. मागील दोन आठवड्यात विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याच्या आमदारांच्या तक्रारी आल्या आहेत.अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर आज चर्चा सुरू होणार आहे. यावेळी अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेराव घालणार आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सर्व भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षाने लावून धरली आहे.

जुन्या पेन्शनसंदर्भात बैठक

जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा न निघाल्यास 14 मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय. आरोग्य कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. यावर आज मुख्य सचिवांनी बैठक बोलावली आहे. यात कर्मचारी, शिक्षक संघटनांचा सहभाग असणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने