लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे गटाच्या वाट्याला किती जागा?

मुंबई: महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे. तेव्हापासून जागा वाटपाचा आघाडीचा फॉर्म्युला कसा असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. दरम्यान यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.काल (बुधवारी) मुंबईत यशंवतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे.एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९, काँग्रेस ८ जागा असा हा फॉर्म्युला ठरला आहे. मुंबईत ६ पैकी ४ जागा ठाकरे गट लढविणार आहे.आघाडीची बैठक काल (बुधवारी) झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहे. त्यापैकी ठाकरे गट 4 जागा लढणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे. मुंबईत ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याने ठाकरे गटाला चार जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे.दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. तर ईशान्य मुंबईमधून राष्ट्रवादी आणि उत्तर मुंबईमधून काँग्रेस लढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत प्राथमिक बोलणी झाली आहे. आघाडीच्या नेत्यांची चर्चेची आणखी एक फेरी होणार असून त्यात अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने