पोर्तुगिजांनी गोव्यात मागे सोडलेला सांस्कृतिक वारसा; सिएस्ता किंवा वामकुक्षी

मुंबई: गोव्यात मिरामारच्या जेसुईटांच्या पूर्व-नॉव्हिशिएट म्हणजे पूर्व-सेमिनरीत असताना वयाच्या सतराव्या वर्षी मला ही सवय लागली ती आतापर्यंत काही सुटलेली नाही. जेसुईटांच्या किंवा इतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरुंच्या संस्थेत सगळा जीवनक्रम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने काळात असतो.पहाटे साडेपाच वाजता पितळेची घंटी वाजवून सर्व मुलांना झोपेतून उठवून दिवसाची सुरुवात होई, तयारी करुन मननचिंतन आणि सकाळचा मिस्साविधी होई आणि रात्री साडेदहा वाजता पुन्हा घंटी वाजून आपापले दिवे मालवून सर्व प्री-नॉव्हिसांना आपल्या मच्छरदाणीच्या बेडमध्ये शिरावे लागे.

दिवसाच्या मध्यंतरात म्हणजे हाऊसमधल्या सर्वांनी एकत्रित जेवून आपापली ताटे धुऊन पुढचा अर्धा तास क्रिएशन पिरीयड म्हणजे विरंगुळा काळ हा पत्ते, बुद्धिबळ खेळण्यात, गिटार वाजवण्यात, कादंबऱ्या वाचत घालवायचा आणि बरोबर दीडच्या ठोक्याला बिडलने म्हणजे मॉनिटरने घंटी वाजविल्यावर पुन्हा एकदा आपल्या बेडवर दुपारच्या झोपेसाठी निद्रित व्हावे, यापासून कुणालाही सुटका नसे. या सक्तीच्या झोपेच्या वेळेत कुणालाही कसलाही आवाज करण्याची मुभा नसायचीदुपारची ही झोप म्हणजे सिएस्ता (Siesta)

गोव्यात सिएस्था एक अगदी संवेदनशील, जिव्हाळयाचा विषय आहे. सिएस्ताच्या वेळी कुणालाही भेट देणे, फोन करणे शिष्टाचारविरोधी समजले जाते. दुपारी चारनंतर मग सगळीकडे दैनंदिन व्यापार पुन्हा सुरु होतात. पत्रकारितेच्या व्यवसायात हा शिष्टाचार मी नेहेमीच पळत आलो आहे.रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी कुणाही व्यक्तीला दुपारी फोन करणे मी शक्यतो या कारणासाठीच टाळत आलो आहे. त्याऐवजी दुपारी चारनंतर फोन करणे हा माझा नेहेमीचा शिरस्ता राहिलेला आहे. भारतात सगळीकडे परदेशी ख्रिस्ती मिशनरींच्या जीवनात सिएस्ता एक महत्त्वाची बाब असायची. बहुतेक ख्रिस्ती धर्मगुरुंच्या दिनचर्येत हे अनुकरण आजही होतेच. सिएस्ताच्या त्या एक तासाला त्यामुळेच आम्ही 'होली अवर' असेही म्हणत असू. लवकरच मी या सिएस्ताच्या कायमच्या प्रेमात पडलो.

मात्र एक तासानंतर अडीचला घंटी वाजल्यावर सिएस्था संपवून तयारी करुन कॉलेजच्या अभ्यासाला लागायचे. त्याकाळात आम्ही धर्मगुरु होण्यासाठी आलेलो आम्ही सर्व पूर्व- प्री-नॉव्हिस मुले मिरामार समुद्रकिनाऱ्यासमोर असलेल्या धेम्पे आर्टस्-सायन्स कॉलेजात किंवा पणजीतल्या डेम्पो कॉमर्स कॉलेजात शिकत होतो. याकाळात दुपारच्या जेवणानंतर गाढ सिएस्ता घेण्याची ती सवय मला लागली ती अगदी कायमचीच !श्रीरामपूरला लहानपणी सूर्य उगविण्याआधीच उठून बसायची सवय होती, माझ्याआधीच दादा उठून आपल्याजागीच बसून 'पवित्र क्रुसाच्या खुणेने' असे म्हणून आपली सकाळची प्रार्थना सुरु करायचे. त्यावेळी मला ''सकाळीच असे भुतासारखे उठून काय बसायचे? असे बाई चिडून म्हणायची, पण एकदा जाग आल्यावर बिछान्यावर पडून राहणे, लोळणे मला कधी जमलेच नाही. आजही तसेच आहे.

घरी दुपारची झोप येणे तर अशक्यच. आणि गोव्यात आता संन्यासी ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी आलो असताना दुपारची झोप घेण्याचे सक्तीचे बनले होते. माझ्या दिनचर्याची आता अविभाज्य भाग असलेल्या सिएस्ता किंवा वामकुक्षीची ही अशी झाली सुरुवात.पदवीधर झाल्यानंतर फादर होण्याचा निर्णय मी बदलला अन त्याऐवजी मी पत्रकार बनलो. गोव्यातल्या त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकात आम्ही सर्व बातमीदार मंडळी सकाळी साडेनऊच्या आसपास मांडवीच्या तिरावर असलेल्या मध्ययुगीन आदिलशाहचा राजवाडा असलेल्या गोवा सचिवालयाच्या प्रेस रुमध्ये जमायचो. गोवा सचिवालय आता पर्वरीला गेले असले तरी तळमजल्यावरच्या प्रेसरुमचा तो बोर्ड अजूनही आहे.

सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स, मंत्र्यांच्या नि सचिवांच्या भेटीगाठी आटोपून बारापर्यंत आम्ही आपापल्या दैनिकांच्या ऑफिसांत पोहोचायचो, तेथे बातम्या टाईप करुन दुपारी एकच्या आसपास घरी निघायचो. सिनियर पत्रकारांचे पर्वरीला पत्रकार कॉलनीत घरे आणि मी सान्त इनेजच्या टोकापाशी ताळगावला राहायचो. पंधरा मिनिटांत जो तो आपापल्या घरी फिश-करी राईस खायला हजर, नंतर मस्तपैकी सिएस्था आणि परत फ्रेश होऊन चारला प्रेसरूमला येऊन तेथे किंवा एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चहापानाला उपस्थित.दुपारच्या त्या झोपेने दिवसभर मरगळ अशी कधी जाणवायची नाही. विशेष म्हणजे पणजीतील आणि गोव्यातील म्हापसा, मडगाव अशा इतर काही शहरांतील अनेक दुकानदारसुद्धा या सिएस्थासाठी आपली दुकाने दुपारी एकदोन बंद तास ठेवत असत. गोव्यात साडेचारशे वर्षे असलेल्या पोर्तुगीज राजवटीचा सिएस्था हा आणखी एक भलाबुरा सांस्कृतिक वारसा !

पोर्तुगिजांनी गोव्यात तसे अनेक सांस्कृतिक वारसे मागे ठेवले आहेत. कामावरुन संध्याकाळी किंवा रात्री घरी परतल्यावर पेयपान आणि जेवणाआधी अंघोळ करुन ताजेतवाने व्हायचे ही गोव्यातील अनेक लोकांची सवय हा त्यापैकी एक पोर्तुगिज सांस्कृतिक वारसा. त्यामुळे ''दुपारी एक ते चार दुकान बंद'' अशी चैन किंवा मक्तेदारी केवळ पुण्यातच चालते असे म्हणण्यास काही अर्थ नाही. तर गोव्यात पत्रकारितेत स्थिर होताना दुपारच्या झोपेची सवय अशाप्रकारे आवश्यकच बनत गेली.खरे पहिले तर सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी. पण तरीही दोन्ही संज्ञा दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय आहेत. जसे पुण्यातली वामकुक्षी आणि गोव्यातली सिएस्ता. भाषेनुसार वेगळे सांस्कृतिक संदर्भ आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने