CISF च्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांना मिळणार १० टक्के आरक्षण; वयोमर्यादेत सूट

मुंबई: केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये रिक्त पदांच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. एक आठवड्यापूर्वी, गृह मंत्रालयाने अग्निवीरांसाठी बीएसएफ भरतीमध्ये अशीच घोषणा केली होती.मंत्रालयाने अग्निवीरांसाठी उच्च वयोमर्यादेतही शिथिलता जाहीर केली आहे. ते अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या किंवा त्यानंतरच्या बॅचच्या आधारावर उपलब्ध असेल. यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा, १९६८ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की १० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव असतील.मंत्रालयाने म्हटलं आहे की माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत आणि इतर बॅचच्या उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल केली जाईल. अधिसूचनेत म्हटले आहे की, माजी कर्मचाऱ्यांनाही शारीरिक चाचणीतून सूट दिली जाईल, म्हणजेच त्यांना शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही.केंद्र सरकारने गेल्या वर्षी १४ जून रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दलात १७ ते २१ वयोगटातील तरुणांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत पहिल्या चार वर्षांसाठी युवकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. या अंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल.

सरकारच्या घोषणेनुसार, अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक बॅचमधील २५ टक्के अग्निवीरांना नियमित सेवा दिली जाईल. यासाठी अग्निवीरांना परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल.अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर, गृह मंत्रालयाने सांगितलं होतं की केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील १० टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील. सध्या निमलष्करी दलात भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने