..तर तिसरं महायुद्ध पाहायला मिळणार; रशिया-युक्रेन युद्धाबाबत ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्धाबाबत  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते एका दिवसात हे विनाशकारी युद्ध संपवू शकतात, असा दावा त्यांनी केलाय.ट्रम्प यांनी शनिवारी 'कंझर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स' (CPEC) मध्ये केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केलं. यावेळी 2024 ची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक  लढवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.आपल्या रिपब्लिकन पक्षाचे  वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गार्डियनच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 मिनिटांचं भाषण केलं. रशिया-युक्रेन युद्ध वेळेवर न संपल्यामुळं तिसऱ्या महायुद्धाबाबतही ते बोलले. मात्र, आपण असं होऊ देणार नसल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.ट्रम्प म्हणाले, युद्ध सोडवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझी चांगली भेट होईल आणि ते माझं नक्कीच ऐकतील. अमेरिकेनं अफगाणिस्तानातून माघार न घेतल्यामुळं ऑगस्ट 2021 मध्ये रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं.जलद पावलं उचलली नाहीत तर तिसरं महायुद्ध पाहायला मिळणार आहे. मात्र, मी एकमेव उमेदवार आहे जो हे तिसरं महायुद्ध थांबवू शकतो. मी ओव्हल ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी रशिया आणि युक्रेनमधील विनाशकारी युद्ध संपवून टाकेन. तिथं काय बोलावं ते मला चांगलं माहीत आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी बायडेन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. आपल्या देशाच्या इतिहासातील ही सर्वात धोकादायक वेळ आहे, असं त्यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने