मुंबई: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केलीये. राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन भाजप माफीची मागणी करत आहे.या मुद्द्यावरून सभागृहातही प्रचंड गदारोळ सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी आज (गुरुवार) संसदेत येऊ शकतात.दरम्यान, अशा परिस्थितीत माध्यमांशी बोलताना कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केलीये.
केंद्रीय कायदा मंत्री काय म्हणाले?
रिजिजू म्हणाले, 'राहुल गांधींनी देशाची बदनामी केलीये. देशाचे नागरिक म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही. लंडनच्या चर्चासत्रात राहुल गांधी जे बोलले त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.त्यांनी लोकशाही, न्यायव्यवस्था आणि देशाचा अपमान केला आहे. देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात आवाज उठवला पाहिजे.'लंडनहून परतल्यानंतर राहुल गांधी आज संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. यादरम्यान ते लंडनमध्ये दिलेल्या भाषणावरून सुरू असलेल्या वादावर बोलू शकतात.
राहुल गांधी लंडनमधील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते, भारतात लोकशाही धोक्यात आली आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर चांगलाच गदारोळ सुरू असून, सत्ताधारी भाजप या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत आहे.याच पार्श्वभूमीवर आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांचीही प्रतिक्रिया समोर आलीये.पित्रोदा म्हणाले, 'राहुल गांधींनी माफी मागावी लागेल असं काहीही बोललं नाही. भारतासारख्या लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे.'