जागतिक महिला बॉक्सिंग आजपासून

 नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेला उद्यापासून भारतातील नवी दिल्ली येथे सुरुवात होणार आहे. भारताच्या १२ महिला बॉक्सर्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या असून लवलिना बोर्गोहेन (७५ किलो वजनी गट) व निखत झरिन (५० किलो वजनी गट) या दोन स्टार खेळाडूंकडून पदकांच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा सुरू होण्याआधी वादविवाद निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना (आयबीए) व आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी) यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नाही. आयबीएचे प्रमुख उमर क्रेमलेव हे रशियाचे आहेत.त्यामुळे त्यांनी जागतिक स्पर्धेमध्ये रशिया व बेलारूस या दोन्ही देशांतील खेळाडूंना त्यांच्या झेंड्याखाली खेळण्याची परवानगी दिली आहे. आयबीएने आयओसीच्या शिफारसीविरोधात हा निर्णय घेतला आहे. रशिया व बेलारूसच्या सहभागामुळे दहापेक्षा जास्त देशांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध काही देशांकडून करण्यात येत आहे.भारतीय संघ ः नीतू घंघास (४८ किलो वजनी गट), निखत झरिन (५० किलो वजनी गट), साक्षी चौधरी (५२ किलो वजनी गट), प्रीती (५४ किलो वजनी गट), मनीषा माऊन (५७ किलो वजनी गट), जास्मिन लॅम्बोरिया (६० किलो वजनी गट), शशी चोप्रा (६३ किलो वजनी गट), मंजू बॅम्बोरिया (६६ किलो वजनी गट), सनमचा चानू (७० किलो वजनी गट), लवलिना बोर्गोहेन (७५ किलो वजनी गट), स्विटी बुरा (८१ किलो वजनी गट), नूपुर शिओरॅन (८१ पेक्षा जास्त किलो वजनी गट).

२००६ची पुनरावृत्ती होईल का?

भारतीय महिला खेळाडूंनी २००६मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये तब्बल आठ पदकांवर नाव कोरले होते. यापैकी चार सुवर्णपदके होती. मेरी कोम, सरिता कुमारी, लेखा के. सी. आणि जेनी आर. एल. या खेळाडूंनी सुवर्णपदकांना गवसणी घातली होती.मागील स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना तीन पदके जिंकता आली होती. यंदा मायदेशात होत असलेल्या स्पर्धेमध्ये भारतीय महिला बॉक्सर्स किती पदकांची कमाई करताहेत हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

न खेळणारे बंडखोर देश

कॅनडा, झेक प्रजासत्ताक, इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, स्वीडन, स्वीत्झर्लंड, युक्रेन व अमेरिका.

दृष्टिक्षेपात

  • १६ ते २६ मार्चदरम्यान स्पर्धा रंगणार

  • ६५ देशांतील जवळपास ३००च्या वर खेळाडूंचा सहभाग

  • सुवर्णपदक विजेत्यांवर १ लाख अमेरिकन डॉलर्सचा वर्षाव

  • रौप्यपदक विजेते ५० हजार, तर ब्राँझपदक २५ हजार डॉलर्सचे मानकरी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने