सत्ताधारी म्हणतात ‘पंचामृत’.. विरोधकांच्या मते स्वप्नरंजन!

जळगाव : शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.सत्ताधारी आमदार, नेत्यांनी अर्थसंकल्पास सर्वसामान्यांचे बजेट म्हणून पूर्ण गुण दिले. तर विरोधकांच्या मते स्वप्नरंजन करणारा अर्थसंकल्प म्हणून त्यावर टीका होतेय..

शेतकऱ्यांसह सर्वांचं भलं करणारा अर्थसंकल्प
गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री) : शेतकरी, युवा, महिला तसेच सर्वसान्य नागरिकांचे भलं करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी व युवक यांच्या जीवनात परिवर्तन करणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना चांगल्या योजना आहेत. मागेल त्याला शेततळे, तसेच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार आहे.महिलासाठीही मोफत एस.टी.सह अनेक योजना आहेत. व्यापाऱ्यानाही जीएसटी तून सवलत देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आपल्या ३० वर्षांच्या राजकीय जीवनातील सर्वात चांगलं असा हा अर्थसंकल्प आहे.


सर्वसमावेशक हिताचा अर्थसंकल्प
गिरीश महाजन (ग्रामविकास मंत्री) : गेल्या तीस वर्षापासून आपण राजकारणात आहोत. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प परिपूर्ण व सर्वसमावेशक हिताचा आहे. असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहे, पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रूपया भरावा लागणार आहे, विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्ती तसेच गणवेश मिळणार आहे. आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. महिलासाठी एस.टी.प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. नागरिकांना आरोग्य सेवेच्याही सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य हिताचा हा अर्थसंकल्प आहे.

ठोस योजना नाही, केवळ घोषणाच घोषणा

एकनाथ खडसे (माजी मंत्री) : अर्थसंकल्पात जनतेसाठी ठोस काहीच नाही, केवळ घोषणा आणि घोषणाच दिसत आहे. महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाला लुभावण्याचा प्रयत्न आहे.केवळ मुंबई, पुणे या मोठ्या शहरासाठीच इन्फ्रास्ट्रक्चर दिसत आहे. शेतकऱ्यांसाठीही थातूर माथूर घोषणा आहेत. केळी, कांदा, कापूस या पिकासाठी कोणतीही ठोस योजना नाही. युवकांच्या बेरोजगारी संदर्भात कोणतीही उपाययोजना नाही. काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.परंतु, त्यासाठी पैसा आणणार कुठून याबाबत कोणतेही ठोस सांगण्यात आलेले नाही. अगोदरच राज्य कर्जाच्या ओझ्याखाली आहे. जर या सवलती द्यावयाच्या असतील. तर त्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागणार आहे. संपूर्ण निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे.


सामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प
सुरेश भोळे (आमदार, भाजप) : राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या पंचामृत आहे. शाश्‍वत शेती- समृद्ध शेतकरी, महिला आदिवासी मागासवर्गसह सर्व समृद्ध घटक, रोजगार निर्मिती सक्षम व यवा रोजगार, पर्यावरण पूरक विकास या पाच तत्त्वांवर आधारलेला आहे. शेतकऱ्यांना शेती विकासाच्या दृष्टीने पुरेशी साथ सरकारने दिली आहे.शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचा भारही कमी करण्यात आला आहे. आता केवळ एक रूपया शेतकऱ्यांना पीक विम्याचा भरावा लागणार आहे. महिलांसाठी एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच लेक लाडकी योजनाही राबविण्यात आली आहे.

जनता धडा शिकवेल
गुलाबराव देवकर (माजी मंत्री) : राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प निराशाजनक आहे. जनतेच्या मनातून उतरलेले, हे सरकार आहे. पुढील निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत देऊन जनता यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा जनतेचाच निर्धार आहे. एकीकडे विकास पूर्णत: खुंटला आहे. ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. याचा सरकारने विचार करावा.

शेतकऱ्यांसाठी सकारात्मक
एस.बी. पाटील (राज्य समन्वयक किसान क्रांती) : पीकविमा योजना एक रुपयात ही अतिशय आश्वासक सुरवात सरकारकडून करण्यात आली असून आता तो शेतकऱ्यांचे पदरात पडण्यासाठी योग्य नियम व अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शेतकरी सन्मान निधीत सहा हजार रुपये महाराष्ट्र शासन देणार त्याऐवजी तेवढी तरतूद जर भावांतर योजनेसाठी केली असती तर सोने पे सुहागा झाले असते. शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बजेट आहे.

सर्वार्थाने ‘होप-लेस’
अनिल भाईदास पाटील (आमदार, अमळनेर) : अर्थसंकल्प सर्वार्थाने होप-लेस आहे. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली असून कपाशी, मका, कांदा यांच्या भावाच्या तसेच खरेदीच्या बाबतीत कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. युवक, महिला, शेतकरी, आदिवासी या सर्वांसाठीच निराशाजनक अर्थसंकल्प आहे. जुनी पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस भूमिका नाही. शेतकऱ्यांना विजबिलमाफीचा कुठलाही दिलासा नाही.

सर्वसमावेशक अर्थसंकल्प
किशोर पाटील (आमदार, पाचोरा) : आतापर्यंतच्या बजेटपेक्षा सर्वांत चांगले व विधायक बजेट आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून बजेट मांडण्यात आला आहे. त्यात लोकहीत आणि सर्वसामावेशकता जोपासण्यात आली आहे. बजेटमधून जळगाव जिल्ह्याला तर मोठ्या प्रमाणात निधी मिळालाच पण पाचोरा -भडगाव मतदार संघाला ही मोठी तरतूद झाली आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

सर्वसामान्यांना दिलासा देणारा
चिमणराव पाटील (आमदार, एरंडोल) : स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याचा इतिहासातील सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थकारण, समाजकारण, धर्म, अध्यात्म, कल्याणकारी अर्थव्यवस्था याचा उत्तमपणे समन्वय या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच शेती शेतकरी असंघटित मजूर सर्व वंचित घटक त्याचबरोबर समाजाला न्याय देणारा व त्यांचे जीवन विश्व प्रकाशमान करणारा हा अर्थसंकल्प आहे.

पंचामृत ध्येयावरील पहिला अर्थसंकल्प
स्मिता वाघ (माजी आमदार) : पंचामृत ध्येयावर आधारित अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प. शेतकरी, महिला, आदिवासी, युवक, मागासवर्ग, ओबीसी यांच्यासोबतच सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प. यापुढे फक्त एक रुपयात पीक विमा भरावा लागणार असल्याने बळीराजाला याचा फायदा होणार असून, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट मिळणार आहे. सर्व घटकांच्या उत्थानाचा हा अर्थसंकल्प आहे.

स्वप्नरंजन दाखविणारा
डॉ. उल्हास पाटील (माजी खासदार) : केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारनेही समाजातील घटकांसाठी मोठमोठ्या घोषणा करून केवळ स्वप्नरंजन दाखविणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी अर्थसंकल्पात ठोस कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन समाजाला खूष करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात झालेला दिसून येतो.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने