रस्ते विकासाचा बॅकलॉग भरुन निघणार; ग्रामीण भागातील 100 कोटींच्या कामांना मंजुरी!

 जळगाव : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. ज्यात राज्याच्या हितासाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या.या अर्थसंकल्पात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील रस्ते व विकासकामांसाठी तब्बल शंभर कोटीच्या भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्था झाल्याने या रस्त्यांच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. या पार्श्‍वभूमीवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद झाल्याने आपल्या मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. यामुळे मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा बॅकलॉग भरून निघेल असे सांगून आमदार चव्हाण यांनी सांगितले, की वेगवान महाराष्ट्र संकल्पना साकार करण्यासाठी ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे.मागीलवर्षी चाळीसगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण मार्गांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती झाली आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात ६८ कोटीचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांना आजतागायत तुटपुंजा निधी मिळत असल्याने वर्षानुवर्ष रस्त्यांची कामे पूर्ण होत नव्हती.माझ्यासह अनेक सदस्यांच्या सूचनेची दखल घेत, यंदाच्या अर्थसंकल्पात प्रथमच जिल्हा परिषेदच्या अंतर्गत ३१ ग्रामीण मार्गाना ३२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची कामे सुरु केली जातील.

एकट्या चाळीसगाव मतदारसंघातील रस्त्यांना १०० कोटींचा निधी मंजूर झाल्याने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.अर्थसंकल्पात तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमधील रस्त्यांसह जोडरस्ते, रस्त्यांना संरक्षण भिंत, स्लॅब ड्रेनचे बांधकाम, जलनिःस्सारणाचे काम यासह इतरही अनेक कामे लवकरच केली जाणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने