कर्ज फेडण्यासाठी अदानी समूह विकणार 'या' कंपनीतील हिस्सेदारी; पुढील आठवड्यात होऊ शकते ब्लॉक डील

दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असलेल्या गौतम अदानी यांचा अदानी समूह बँकांमधील कर्ज कमी करण्याच्या तयारीत आहे.गौतम अदानी यांना आता कर्जाचा बोजा कमी करायचा आहे. अदानी समूह आता यासाठी निधी उभारण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह निधी उभारण्यासाठी अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विकण्याच्या प्रक्रियेत आहे.फायनान्शिअल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अंबुजा सिमेंटच्या प्रमोटर्स अदानी यांनी कर्जदारांकडून परवानगी मागितली आहे. अदानी समूह दुय्यम बाजारात ब्लॉक डीलद्वारे अंबुजा सिमेंटमधील 4.5 टक्के हिस्सा विकू शकतो.अहवालानुसार, अदानी समूह अंबुजा सिमेंट्समधील 4-5 टक्के हिस्सा सुमारे 450 दशलक्ष डॉलरमध्ये विकू शकतो. अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्समधील आपला हिस्सा विकल्यास, कर्ज कमी करणारी ही समूहाची पहिली मालमत्ता विक्री असेल.आठवड्याच्या सुरुवातीला, ब्लूमबर्गने अहवाल दिला की अदानी समूहाने 9 मार्च रोजी 500 दशलक्ष डॉलर ब्रिज कर्जाची परतफेड केली आहे. अंबुजा सिमेंटच्या किंमतीनुसार शेअर्सची विक्री करून 3380 कोटी रुपये उभारण्यात समूहाला यश मिळू शकते.

अदानी ग्रुपने गेल्या वर्षी होल्सीम ग्रुपचा अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या दोन भारतीय कंपन्यांमधील संपूर्ण हिस्सा विकत घेतला. हे सौदे अदानी समूहाने 10.5 अब्ज डॉलर्समध्ये केले होते. अदानी समूहाचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण होते.होल्सीमने अंबुजा सिमेंट्स लिमिटेड मधील 63.19% आणि ACC मधील 54.53% हिस्सा अदानी ग्रुपला विकला.अदानी समूहाने होल्डरिंड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेइकल्सच्या माध्यमातून अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीची खरेदी केली होती.अदानी समूहाने अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विकल्याच्या वृत्ताचा परिणाम शेअर्सवर दिसून येतो. या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.काल अंबुजा सिमेंटचा शेअर 378 रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांपासून अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने