धुळे : राज्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करीत आहेत. या संपात धुळे जिल्ह्यातीलही तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.त्यामुळे शासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संपात सहभागी सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना जाहीर नोटीस जारी केली असून, कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.
संपात सहभागी होऊन कार्यालयीन शिस्तभंग करणे ही आपली कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ नुसार असल्यामुळे आपण शिस्तभंग कार्यवाहीसाठी पात्र आहात, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये केंद्र सरकारचे ‘काम नाही वेतन नाही’ हे धोरण राज्य सरकारनेही अनुसरले असल्याने आपला संप कालावधी विनावेतनसाठी गणला जाईल.तसेच आपण संपामध्ये भाग घेतलेला कालावधी हा सेवेतील खंड कालावधीही गणला जाईल याची नोंद घ्यावी व नियमित कर्तव्यावर हजर होऊन शासकीय कामकाज सुरळीत पार पडण्यास सहकार्य करावे. वेळेअभावी सर्व संपात सहभागी कर्मचाऱ्यांना ही जाहीर नोटीस काढण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी नोटिशीत म्हटले आहे.