जादा मतदार असलेल्या गावांवर ‘लक्ष’

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत मतदार जास्त असलेल्या गावांवर दोन्ही आघाड्यांनी आतापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी मेळावे, सभासदांच्या गाठीभेटी आणि संपर्क अभियानातून मतदार जागृती सुरू आहे. मोठी गावे कोणाच्या मागे रहाणार यावर कारखान्याचा निकाल अवलंबून असेल.‘राजाराम’ चा बिगुल आज जरी वाजला असला तरी दोन्ही आघाड्यांकडून त्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरूध्द माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी एकमेकांविरुध्द शड्डू ठोकला आहे.



श्री. पाटील यांनी बावड्यातील श्रीराम सोसायटीचे आजी-माजी संचालक, माजी नगरसेवक, प्रमुख आणि विश्‍वासू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात राबता वाढवला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाडीक गटानेही कारखान्याचे आजी-माजी संचालक, प्रमुख कार्यकर्ते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.विरोधी आघाडीची धुरा स्वतः सतेज पाटील यांनी आपल्या हातात घेतली आहे तर सत्तारूढ गटासाठी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार अमल महाडीक यांच्यासह त्यांचे कट्टर कार्यकर्ते मैदानात उतरले आहे.

हातकणंगले व करवीर तालुक्यात कारखान्याचे सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर दोन्ही आघाड्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या निवडणुकीत श्री. महाडीक यांना हातकणंगले तालुक्याने तारले, त्यामुळे या तालुक्‍यावर विरोधी आघाडीनेही लक्ष केंद्रीत केली आहे.त्यात दोनशेपेक्षा जास्त मतदार असलेली गांवे महत्त्वाची ठरणार असल्याने याच गावांवर दोन्ही गटांकडून मोठी ‘फिल्डींग’ लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्या गावांतील मुख्य नेते, कार्यकर्ते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. जबाबदारी सोपवलेल्या या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा आतापासूनच कार्यरत झाली आहे.

२०० पेक्षा जास्त मतदार असलेली गावे

हातकणंगले तालुका - पुलाची शिरोली - ९६४, कुंभोज- ३१६, नरंदे-३२२, टोप, मौजे-४३०, रूकडी-२८३, भेंडवडे-२०६, लाटवडे-२२०, नागाव- २१७, पेठ वडगांव-२२०, वडगांव मौजे- २६३.

करवीर तालुका- कसबा बावडा - ९७५, करवीर शहर- ३४८, शिये-३५३, वडणगे-४७९, गडमुडशिंगी-४४३, वाशी-४३३, कांडगाव-३०७, चिखली- २०३, निगवे दुमाला- २७६, कळंबे तर्फ ठाणे-२३१.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने