आनंदीबाई डॉक्टर बनल्या पण लोकांची सेवा करण्याचे स्वप्न अपुरेच राहिले!

मुंबई:   आज जगभरात अनेक महिला कठोर परिश्रम करून चांगल्या आणि उच्च पदावर नोकरी करत आहेत. महिलांच्या स्थितीत बदल घडवून आणण्यात इतिहासातील अनेक महिलांंची भूमिका प्रमुख आहे. आज जरी महिला वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी मिळवत आहेत, अभियंता होत आहेत. परंतु या क्षेत्रांत सहभागी होऊन भविष्यात महिलांसाठी मार्ग मोकळे करणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणाऱ्या महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्या काळात वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी परदेशात जाऊन भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचे श्रेय आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना जाते. जाणून घेऊया देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबेन गोपाळराव जोशी यांच्याबद्दल.

नाकात नथीचा आकडा घातलेली. कृष शरीरबांध्याची व बोटीच्या तसेच जीवन सागरातील परावासाने थकलेली अशी मनस्वी स्त्री मुंबईच्या किना-यावर उतरली व तिच्या पदस्पर्शाने भारतातील स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.ती स्त्री म्हणजेच डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी. १९व्या शतकात केवळ पतीच्या इच्छेसाठी स-या समाजाचा रोष व विरोध पत्करून हि महिला शिकली व पुढे अमेरिकेस जाऊन वैद्यकीय पदवी मिळवली.आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च, १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.

गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला.परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले.गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या.  गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता.

आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करीत होते. कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता.आनंदीबाईंच्या आईला शिक्षणाचे महत्व मुळीच नव्हते. त्यामूळे ती मात्र आनंदीचा अतिशय राग-राग करायची. तिच्या मागे कामांचा सपाटा लावून तिला अभ्यासाला वेळच देत नसे. तरीही तिने अभ्यास केला नाही. तर पतीचा मार खायचा व केला तर आईचा मार खायचा, असे घोर संकट आनंदीबाई वयाच्या १० - १२ व्या वर्षी झेलत होत्या.एकदा आईने जळक्या लाकडाने दिलेल्या माराणे शरीरावर झालेल्या जखमा गोपाळरावांचे निदर्शनास आले व या घरात राहुन तिचा अभ्यास होणार नाही, या विचाराने त्यांनी आपली बदली अलीबाग येथे करवून घेतली.

अलिबाग मध्ये आनंदीबाईच्या अभ्यासाला गती आली. तिचे भाषेचे ज्ञान वाढावे म्हणून मराठी बरोबरच संस्कृत भाषेचे शिक्षण त्यांनी सुरु केले.  आपल्या पतीवरील विश्वास व त्यांची कार्यावरील निष्ठा यामुळे आनंदिनेही हे शिक्षणाचे व्रत स्वीकारले व त्या दोघांमध्ये पती-पत्नी पेक्षा गुरु-शिष्याचे नाते अधिक दृढ झाले.पुढे या दाम्पत्याची ओळख कोल्हापुरास बदली केली असताना अमेरिकेतील ख्रिस्ती धर्म-मंडळाचे प्रमुख  मि. वाईल्डर यांच्याशी झाली. कर्मधर्म संयोगाने अमेरिकेतील मि. वाईल्डर यांचेशी झालेला पत्रव्यवहार "रुसेल ' या गावात स्थायिक असलेल्या मिसेस.कार्पेटर यांच्या वाचनात आला व अंत:स्फूर्तीने प्रेरित होऊन त्यांनी भारतातील आनंदीबाईंशी पत्रव्यवहार केला.अखेर मिसेस. कार्पेटर यांच्या मदतीने ७ एप्रिल १८८३ हा दिवस आनंदीबाईच्या अमेरिकेच्या प्रयाणासाठी निश्चित झाला.

मेट्रिक परीक्षाही पास न झालेली अवघ्या १८ वर्षाची नऊवारी साडी नेसलेली, नाकात नथ घालणारी हि भारतीय तरुणी ७ एप्रिल १८८६  रोजी कलकात्ता बंदरावरील 'सिटी ऑफ बर्लिन ' या बोटीत विराजमान झाली. ४ जून १८८६ रोजी  त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला व मिसेस. कार्पेटर यांच्या घरी राहू लागल्या. पुढे अत्यंत प्रतिकूल परस्थितीतही त्यांनी अभ्यासाची कस सोडली  नाही व वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतली.  ११ मार्च १८८६ रोजी त्यांचा पदवीदान समारंभ झाला  व  त्यांना एम. डी. हि पदवी मिळाली.अखेर ९ ऑक्टोंबर १८८६ रोजी 'इट्सरिया' या बोटीने हे दांपत्य भारताकडे परत येण्यास निघाले. कष्टमय जीवनाचा अतिरेकाने आनंदीबाईंना क्षयरोगाने त्रासले होते. १६ नोव्हेंबर १८८६ रोजी हि बोट मुंबईच्या किना-यावर आली.आपल्या मायदेशात परत आल्याचा आनंद त्यांच्या मुखावर दिसत होता. पण शरीर मात्र थकले होते. शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आनंदीबाईचे व गोपाळरावांचे स्वप्न पूर्ण झाले.आनंदीबाई भारतात परतल्यावर कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचे काम त्यांनी पाहिले.  इतकी मोठी पदवी मिळवल्यानंतर समाजाची, लोकांची सेवा करण्याचे आनंदीबाईंचे स्वप्न पूर्ण झाले नाही. डॉक्टर पदवी घेतल्यानंतर वर्षभरातच २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांचे निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने