साता समुद्रापार मेलबोर्न मध्ये झाला 'रमाई' चा प्रकाशन सोहळा

मेलबोर्न : ऑस्ट्रेलिया येथील मेलबोर्न स्थित रश्मी गोरे यांच्या मातोश्री सुधा गोखले (मुंबई) यांच्या 'रमाई' या तृतीय काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच सानंद संपन्न झाला. मेलबोर्न येथील वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानसमृद्ध अशा डॉ. जयंत बापट काकांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी श्री.बापट म्हणाले की सुधा गोखले यांनी अत्यंत सुरेल व हलक्या फुलक्या शब्दात केलेल्या काव्य- रचना गेय, भावपूर्ण व सर्वाना भावणाऱ्या आहेत.मुंबईस्थित सुधा गोखले यांचे यापूर्वी दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या गीताव्रती असून गीता परिवारामार्फत जे उपक्रम राबविले जातात त्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. लहान मुलांसाठी त्या संस्कार वर्गही चालवितात.'आपला' रमाई' हा काव्यसंग्रह त्यांनी मातेच्या चरणी अर्पण केला आहे. 'रमा' या आपल्या आईच्या प्रेरणेमुळेच आपला आजपर्यंतचा हा प्रवास सुखकर व आनंदमय झाला आहे असे त्यांना वाटते.या प्रसंगी वसंत गोरे यांनी प्रास्ताविक केले. वसंत गोरे यांचे कुटुंबीय आणि सुधा गोखले यांच्या मैत्रिणी (सखी) या प्रसंगी उपस्थित होत्या. सर्व सखींच्या वतीने शैलजा निटवे यांनी सुधा गोखले यांच्याविषयी लिहिलेले एक 'गौरव गीत ' सादर केले. रश्मी गोरे यांनी आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने