‘आदिवासीं’चे लाल वादळ मुंबईच्या दिशेने; पालकमंत्र्यांची मध्यस्थी अपयशी

 नाशिक : राज्यातील आदिवासींसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचार पक्षांच्या नेतृत्वाखालील पायी ‘लॉंग मार्च’ सोमवारी (ता. १३) नाशिकमधून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला.राज्यभरातून आलेले सुमारे सहा हजार आंदोलक यात सहभागी झाले. दरम्यान, मुंबईत विधानभवनात अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातर्फे लॉंग मार्च रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही.सोमवारी रात्री हा लॉंगमार्च मुंढेगाव परिसरात मुक्कामी पोहचला आहे. यासाठी शहर, जिल्हा पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले होते. तत्पुर्वी लॉंग मार्च रविवारी (ता. ११) नाशिकमध्ये दाखल झाला. माजी आमदार जे. पी. गावित यांनी लॉंग मार्चची हाक दिली होती.



त्यानुसार नाशिक जिल्ह्यासह पालघर, अहमदनगर, नांदेड, जालना, बुलढाणा आदी जिल्ह्यांतून सुमारे सहा हजार आदिवसी बांधव यात सहभागी झाले आहेत. तर, इगतपुरीतून त्र्यंबकेश्‍वरसह शहापूर, डहाणू, नवी मुंबई या परिसरातील आदिवासी शेतकरीही सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी म्हसरूळ येथून लॉंग मार्चला सुरवात झाली.श्री. गावीत, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, जनवादी महिला संघटनेचे मारियम ढवळे, इंद्रजित गावित, मोहन जाधव, रमेश चौधरी, सुभाष चौधरी, भीका राठोड, सावळीराम पवार आदीसंह आदिवासी बांधव मोर्चाच सहभागी झाले.

मुंबईत आज बैठक

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १४) दुपारी तीनला मंत्रालयात बैठक होणार आहे. बैठकीला मोर्चेकरूंतर्फे माजी आमदार गावीत, डॉ. नवले, डॉ. नारकर, सुभाष चौधरी, उमेश देशमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे मोर्चेकरूंचे लक्ष लागून आहे. मागण्यांवर चर्चा होणार असली तरी मोर्चा थांबणर नसल्याची भूमिका आयोजकांनी स्पष्ट केली आहे.

महिलांचा लक्षणीय सहभाग

लॉंग मार्चमध्ये आदिवासी बांधवांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. वयोवृद्ध ते तरुण महिलांही या मोर्चातून मुंबईच्या दिशेने पायी चालत होत्या. मोर्चेकरूंसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.तर, मोर्चा मुंबईच्या दिशेने जात असल्याने दुसऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात येऊन, सर्व्हिस रोडचा वापर करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने