घाबरू नका, जागरूक राहा अन् काळजी घ्या!

कोल्हापूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लू (एच३एन२) फ्लूचे पाच रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन संक्रमित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले.राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही खबरदारी घ्यावी, अशी सूचना रेखावार यांनी बैठकीत केल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली. स्वाईन फ्लूची लागण झाली म्हणून रुग्णांनी घाबरून जाऊ नये.

योग्य उपचार घेतल्यानंतर हा रोग बरा होत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू झाला म्हणून किंवा होईल म्हणून घाबरून जाऊ नका. पण, योग्य ती दक्षता घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.पत्रात म्हटले आहे की, ग्रामीण भागात सर्दी, ताप, घसादुखी, घसा लालसर होणे यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाधित रुग्णांच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यानंतर त्यांना उपचार दिले पाहिजेत.इन्फ्ल्यूंझा रोगासाठी लागणारी सर्व औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन ठेवावीत. जिल्ह्यात या रुग्णांचे निदान करण्यासाठी सीपीआर येथील प्रयोगशाळेत असणाऱ्या किटचा वापर करावा.यासाठी विशेष मनुष्यबळ दिले जावे. अधिष्ठातांनी रुग्णांच्या तपासणीसाठी योग्य नियोजन करुन येणाऱ्या रुग्णांना वेळेत औषध उपचार देण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. वयोवृद्ध किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांसाठी मास्कचा वापर करावा, अशाही सूचना दिल्या आहेत. यावेळी, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, डॉ. उत्तम मदने उपस्थित होते.लक्षणे

ताप
खोकला
घशात खवखव
धाप लागणे
अंगदुखी

यांना धोका

गर्भवती
लहान बाळ
ज्येष्ठ नागरिक
रोग प्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण
वैद्यकीय आणि सर्जिकल रुग्ण
दीर्घकालीन औषधे घेणारे रुग्ण

प्रतिबंधात्मक उपाय

वारंवार साबण व स्वच्छ
पाण्याने हात धुवा
पौष्टिक आहार घ्या
लिंबू, आवळा, संत्री, हिरव्या पालेभाज्या याचा आहारात समावेश करा
धूम्रपान टाळा
पुरेशी झोप घ्या
भरपूर पाणी प्या

हे करू नका

हस्तांदोलन
फ्ल्यूची लक्षणे असल्यास
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका

विषाणूंमुळे होणारा आजार

इन्फ्लूएंझा हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. याचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे प्रकार आहेत. सध्या आढळणाऱ्या रुग्णांना ‘ए’ या उपप्रकारातील इन्फ्लूएंझाचा संसर्ग होत आहे.

रुग्णाने घ्यायची काळजी

कुटुंबात विलगीकरण कक्षात राहावे
मधुमेह, उच्चरक्त दाबाच्या रुग्णांजवळ जाऊ नये
घरात ब्लिच द्रावण तयार करावे. त्याने टेबल, खुर्चीसह रुग्णाचा स्पर्श होणारी वस्तू पुसावी
दिवसातून दोन वेळा गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात आणि वाफ घ्यावी
रुग्णाने वापरलेले मास्क, टिश्यूपेपर कुठेही टाकू नयेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने