सत्ताधारी धुळवड खेळण्यात दंग, सभागृहात विरोधक संतापले! फडणवीस म्हणाले, "बोलायला लावू नका"

मुंबई : राज्यभरात काल अचानकपणे वादळी वारा, प्रचंड पाऊस, गारपिट यामुळे अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र सत्ताधारी काल धुळवड खेळण्यात व्यस्त होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रंगपंचमी साजरी केली त्यामुळे विरोधक एकवटले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. यावेळी विरोधकांनी सभात्याग केला.अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी अडचणीत आले असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते, असा आरोप अजित पवार यांनी केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षाने सभात्याग केला.


सरकारच्या वतीने सभागृहात करण्यात आलेले निवेदन अपुरे आहे. अनेक नुकसानग्रस्त भागांचा उल्लेख या निवेदनात नाही. राज्यातला शेतकरी हतबल असताना सरकारने बघू, करु अशी उत्तरे न देता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.आमदार छगन भुजबळ यांनी देखील सरकारवर हल्लाबोल करत नाराजी व्यक्त केली. सरकार मंगळवारी रंगाची होळी खेळत होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या पीकांची होळी होत होती. सरकार यावर ताबडतोब काय पावले उचलणार आहे, हे सांगितले पाहिजे. शेतकरी कर्ज कसे फेडणार? असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी केला.गेले तीन दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी छगन भुजबळ यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आणि याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचे म्हणणे मांडणार असल्याचे सभागृहाला सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने