कर्नाटकात भाजपला धक्के बसण्यास सुरुवात; सरकारमधील मंत्रीच काँग्रेसच्या वाटेवर?

बंगळुरू:  आगामी काळात कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसण्याची शक्यता असून कर्नाटक सरकारमधील मंत्री व्ही. सोमन्ना बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमन्ना हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची कुणकुण लागताच, सत्ताधारी भाजप पक्षाने आपल्या निवडणूक व्यवस्थापन समितीत सोमन्ना यांचा समावेश केला नाही. त्याच कारण म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीलाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कर्नाटकमध्ये भाजपची पहिली जनसंकल्प सभा घेतली होती. या यात्रेला, मंत्री सोमन्ना यांनी दांडी मारली होती. त्यामुळे सोमन्ना भाजप सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.दुसरीकडे भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीत स्थान न मिळाल्याने मंत्री सोमन्ना यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच सोमन्ना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.सोमन्ना म्हणाले की, मी आता ७२ वर्षांचा आहे. त्यामुळे माझ्याकडे करण्यासारखं काहीही नाही. मात्र मी कायम प्रवाही आहे. माझ्या मतदार संघातील जनतेने मला कायम त्यांचा मुलगा मानलं आहे.यावेळी सोमन्ना यांना पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीत स्थान न मिळाल्याबद्दल विचारण्यात आलं. मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना या प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. याआधी, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशा बातम्या आल्या होत्या. मात्र, या सगळ्यावर पडदा टाकत भाजपने बीएस येडियुरप्पा यांना सदस्यपदी कायम ठेवत बोम्मई यांना अध्यक्षपद दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने