"त्यांची भांग कसब्यात उतरली"; फडणवीसांच्या 'त्या' विधानाचा राऊतांनी घेतला समाचार

मुंबई: आमच्या मित्रांना भांग पाजण्यात आली, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली. या टीकेलाच आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कसब्यात यांची भांग उतरली, असं राऊत म्हणाले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीसांचा धुळवड खेळतानाचा एक फोटोही राऊतांनी ट्वीट केलं आहे.माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या त्या विधानाचा समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले, "त्यांनीच भांग पाजली का? महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले? भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत, त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे."याचबद्दल संजय राऊतांनी ट्वीटही केलं आहे. या ट्वीटसोबत राऊतांनी फडणवीसांचा धुळवड खेळतानाचा फोटो शेअर केला आहे.या फोटोसोबत केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे. बांधावर पिकं आडवी झाली. शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात न्हाऊन निघालं. ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय?"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने