ट्रोलर्सचा सरन्यायाधीशांवर निशाणा! खासदारांचं थेट राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली, पण या सुनावणीदरम्यान ट्रोलर्सनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची मोहिम राबवली. याविरोधात विरोधीपक्षाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेतली असून त्यांना याबाबत तक्रारीचं पत्रही दिलं आहे.काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळं मविआचं सरकार कोसळलं होतं, त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन नवं सरकार स्थापन केलं. पण याविरोधात उद्धव ठाकरे यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याला आता ९ महिने उलटले आहेत. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात पाच सदस्यीय खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे. या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले होते. सरन्यायाधीशांच्या या टिप्पण्यांनंतर सोशल मीडियावरुन सरन्यायाधीशांविरोधात टीकेची मोहिम राबवण्यात आली. ट्रोलर्सनी सरन्यायाधीशांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं.

याप्रकरणी खेद व्यक्त करताना विरोधीपक्षाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. "न्यायालयाच्या प्रक्रियेत हस्तक्षेपाचा हा प्रकार असून याप्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी. यामध्ये केवळ ट्रोल करणाऱ्या व्यक्तींवरच कारवाई होऊ नये तर या ट्रोलर्सना पाठिंबा देणारे तसेच ट्रोलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्या शक्ती आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी. या पत्राची प्राधान्यानं दखल घेत गुन्हेगारांवर तातडीनं कारवाई व्हावी," अशी मागणी या पत्रातून खासदारांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने