एक दिवस पाकिस्तान-बांगलादेश स्वतःच भारतात..; निश्चलानंद महाराजांचं मोठं विधान

ग्वाल्हेर : एक दिवस पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतःच भारतात विलीन होतील, असा विश्वास पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज  यांनी व्यक्त केला.ते एका दिवसाच्या मुक्कामावर ग्वाल्हेरला आले होते. आजच्या युगाशी संबंधित अनेक मुद्दे त्यांनी इथं मांडले. शिवाय, त्यांनी बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या हिंदू राष्ट्राच्या मागणीवर मत मांडलं, तर दुसरीकडं मुस्लिम धर्मगुरूंच्या मुस्लिम राष्ट्राच्या मागणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.यासोबतच महाराजांनी भारताचा विश्वगुरू होण्याच्या प्रवासाविषयी सांगितलं आणि अखंड भारत का आवश्यक आहे? यावरही त्यांनी प्रकाश टाकला. जगतगुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्काराविषयी सांगितलं की, 'धीरेंद्र एकदा मला भेटायला आले होते. मी धीरेंद्रची कथा किंवा प्रवचन कधीच ऐकलं नाही. शंकराचार्य असल्यामुळं मी माझा सर्व वेळ पुस्तकं लिहिण्यात आणि राष्ट्राचा विचार करण्यात घालवतो. पण, हिंदूंना भरकटण्यापासून वाचवणारी व्यक्ती म्हणजे धीरेंद्र आहेत.'पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यासह इतर संतांनी हिंदू राष्ट्राच्या मागणीवर आवाज उठवल्यानंतर जगतगुरु शंकराचार्य म्हणाले, भारतासोबतच संपूर्ण आशिया खंडाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं लागेल. कारण, सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदू होते. कोणाला काही शंका असतील तर त्याही आम्ही सोडवू. मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज कोण होते हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल, त्यांनी हिंदू धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करावा. भगवान विष्णू हे सर्वांचे पूर्वज आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने